एमआयडीसीमध्ये मद्यसाठा ठेवलेल्या गोडाऊनवर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 23:26 IST2019-07-10T23:26:54+5:302019-07-10T23:26:59+5:30

सव्वा कोटीचे मद्य जप्त : शासनाचा ६३ लाखांचा महसूल बुडविण्याचा प्रयत्न : दोघांना केली अटक

Printed on Godown kept in the madrassa MIDC | एमआयडीसीमध्ये मद्यसाठा ठेवलेल्या गोडाऊनवर छापा

एमआयडीसीमध्ये मद्यसाठा ठेवलेल्या गोडाऊनवर छापा

नवी मुंबई : एमआयडीसीमधील गोडाऊनवर छापा टाकून पोलिसांनी एक कोटी १४ लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे. शासनाचा ६३ लाख रुपयांचा महसूल बुडविण्याचा प्रयत्न उधळून लावला असून या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.


हरियाणामधून अवैधपणे मोठ्या प्रमाणात मद्यसाठा ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये आणला जाणार असल्याची माहिती तुर्भे एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर देसाई व त्यांच्या पथकाने मंगळवारी मध्यरात्रीच सापळा रचला होता. बुधवारी पहाटे डी ८५ या बंद पडलेल्या कंपनीवर छापा टाकला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मद्यसाठा आढळून आला. आरजे २७ जीबी २०२० हा कंटेनरही जप्त केला असून, त्यामध्येही मद्य आढळून आला. कंपनीमधील सुरक्षारक्षक केबिनच्या बाजूच्या खोलीमध्ये मद्यसाठा करून ठेवला होता. पोलिसांनी कंटेनरचे सील तोडून त्यामधील दारूच्या बॉटल काढून घेऊन पंचनामा केला. ५५ हजार दारूच्या बॉटल आढळून आल्या असून त्याची किंमत एक कोटी १४ लाख ४७ हजार रुपये आहे. राज्य शासनाचा जवळपास ६३ लाख रुपयांचा महसूल बुडविण्याचा प्रयत्न होता. दुपारपर्यंत मद्यसाठा मोजण्याचे काम सुरू होते.


पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. ताब्यात घेतलेला मद्यसाठा हरियाणामधून आलेला आहे. ते मद्य हरियाणामध्ये विक्री करण्यासाठी बनविण्यात आले होते. मद्याच्या बॉटलवर त्या प्रकारे उल्लेखही करण्यात आला होता; परंतु आरोपींनी विनापरवाना हा मद्यसाठा येथे आणला होता. या टोळीमध्ये अजून कोणाचा समावेश आहे का, याचाही पोलीस तपास करत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर देसाई, पोलीस निरीक्षक सुनील शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष जाधव, दिपक डोंब, पोलीस उपनिरीक्षक गणेश फरताडे, सुधीर टेंगळे, दत्तात्रेय भोरे, सुमित सलगर, दिनेश मोरे, एडके, इंगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.


च्पोलिसांनी या प्रकरणी मुकेशकुमार नंदराम यादव या कंटेनर चालकाला अटक केली आहे. तो राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील रहिवासी आहे. नवी मुंबईमधील गणपतीपाडा येथे राहणाऱ्या सोनू शिवगणेशलाल श्रीवास्तव यालाही अटक केली आहे. या टोळीतील मुख्य आरोपी अद्याप सापडलेले नसून त्यांचा शोध सुरू केला आहे. मद्याची वाहतूक केलेला कंटेनरही जप्त करण्यात आला आहे.


मार्चमध्ये सापडला होता ७३ लाखांचा साठा
च्तुर्भे एमआयडीसी येथील साईनाथ ग्रेनाइट या गोडाऊनमध्ये गुन्हे शाखेने २३ मार्चला मध्यरात्री छापा टाकला होता. गोडाऊनच्या एका भागामध्ये बॉक्समध्ये दारूच्या बाटल्या आढळून आल्या. त्यापैकी काही बॉक्स पोलिसांनी तपासले असता, त्यामध्ये फ्रान्स देशातील महागडी वाइन आढळली. पोलिसांनी केलेल्या मूल्यमापनामध्ये या दारूसाठ्याची किंमत ७३ लाख ६२ हजार रुपये असल्याचे स्पष्ट झाले होते.

Web Title: Printed on Godown kept in the madrassa MIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.