ज्वेल ऑफ नवी मुंबईत आढळले पीपीई किट; कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 23:20 IST2020-09-11T23:20:09+5:302020-09-11T23:20:09+5:30
आरोग्याचा प्रश्न गंभीर

ज्वेल ऑफ नवी मुंबईत आढळले पीपीई किट; कारवाईची मागणी
नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील कचरा कुंड्यांमध्ये वापरलेले पीपीई किट आढळून आल्याच्या घटना आजवर अनेक ठिकाणी घडल्या आहेत, परंतु ज्वेल आॅफ नवी मुंबई यासारख्या ठिकाणीही वापरलेल्या पीपीई किट आढळून आल्या आहेत. अशा घटनांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
नवी मुंबई शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, संसर्ग, तसेच मृत्युदर रोखण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या नेतृत्वाखाली विविध उपाययोजना केल्या जात आहेत. नवी मुंबई शहरातील विविध भागांमधील कचराकुंड्यामध्ये जैविक कचरा, तसेच वापरलेल्या पीपीई किट आढळून आल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.
नेरुळ येथील ज्वेल आॅफ नवी मुंबई या ठिकाणी नागरिक व्यायाम करण्यासाठी येतात. या परिसरात वापरलेल्या पीपीई किट, ग्लोव्ज आढळून आले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात घडत असलेल्या अशा घटनांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती असून, पालिकेद्वारे कारवाई करण्याची मागणी होत आहे. शिवसेनेचे युवा शाखा अधिकारी अजय तळेकर आणि सुनील पाटील यांनी याबाबत आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे तक्रार केली असून, अज्ञात इसमावर गुन्हे नोंदविण्यात यावेत, अशी मागणी केली आहे, तसेच ज्वेल आॅफ नवी मुंबई या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्यासाठी सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्याची मागणी केली आहे.