पोशीर जलवाहिनीची गळती थांबली
By Admin | Updated: May 24, 2017 01:24 IST2017-05-24T01:24:52+5:302017-05-24T01:24:52+5:30
पोशीर आणि चिकनपाडा गावाला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत होती.

पोशीर जलवाहिनीची गळती थांबली
लोकमत न्यूज नेटवर्क
नेरळ : पोशीर आणि चिकनपाडा गावाला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत होती. अनेक वेळा नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणूनही ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केले होते. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने ‘पोशीरमधील मुख्य जलवाहिनीला गळती’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. याची दखल घेत ग्रामपंचायतीने जलवाहिनीची दुरुस्ती केली. त्यामुळे होणारी पाण्याची गळती थांबली
आहे.
ही मुख्य जलवाहिनी एप्रिल महिन्यात चिकनपाडा गावाजवळ फुटली होती. तेव्हापासून हजारो लिटर पाणी वाया जात होते. त्यामुळे काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. तेव्हा चिकनपाडा ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने त्यांनी ग्रामपंचायतीच्या वेळोवेळी निदर्शनास आणून दिले. तसेच लेखी पत्रव्यवहार केला; परंतु पत्रव्यवहार करून २० दिवसांचा कालावधी लोटला तरी ग्रामपंचायतीने ही पाइपलाइन दुरुस्त केली नव्हती. ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणूनही ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले होते. त्यामुळे फुटलेली मुख्य पाइपलाइन लवकर दुरुस्ती करावी आणि पाण्याची होणारी गळती थांबवावी, अशी मागणी चिकनपाडा ग्रामस्थांनी केली होती.
यासंदर्भात पोशीर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका एस. कडाळी आणि सरपंच हरिश्चंद्र निरगुडा यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांच्याकडून ही फुटलेली जलवाहिनी दोन दिवसांत दुरुस्त करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार ही जलवाहिनी दुरुस्त करण्यात आल्याने होणारी पाण्याची गळती थांबली आहे. यामुळे योग्य पाणीपुरवठा होणार असून नागरिकांनी समाधान व्यक्त के ले आहे.