कासाडी नदीला प्रदूषणाचा विळखा
By Admin | Updated: August 7, 2016 03:29 IST2016-08-07T03:29:33+5:302016-08-07T03:29:33+5:30
तळोजा औद्योगिक वसाहतीमधून वाहणाऱ्या कासाडी नदीला प्रदूषणाचा विळखा पडला आहे. रासायनिक कारखान्यांमधील दूषित पाणी नदीच्या पात्रात सोडले जात आहे.

कासाडी नदीला प्रदूषणाचा विळखा
- वैभव गायकर, पनवेल
तळोजा औद्योगिक वसाहतीमधून वाहणाऱ्या कासाडी नदीला प्रदूषणाचा विळखा पडला आहे. रासायनिक कारखान्यांमधील दूषित पाणी नदीच्या पात्रात सोडले जात आहे. दोन दशकांपासून सातत्याने होणाऱ्या प्रदूषणामुळे मत्स्य उत्पादनावर परिणाम झाला असून त्यावर उदरनिर्वाह अवलंबून असणाऱ्या कोळी बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे.
मुंबईमधील मिठी नदीच्या पात्रामध्ये झालेल्या अतिक्रमणांमुळे २६ जुलै २००५ च्या मुसळधार पावसामध्ये प्रचंड जीवित व वित्तहानी झाली. या दुर्घटनेनंतरही शासनाने अद्याप काहीच बोध घेतलेला नाही. शहरीकरण झालेल्या ठाणे व रायगड जिल्ह्यांमधील नद्यांचीही अवस्था मिठी प्रमाणे होऊ लागली आहे. यामध्ये सर्वात गंभीर स्थिती तळोजा औद्योगिक वसाहतीमधून वाहणाऱ्या कासाडी नदीची आहे. नदीच्या काठावर रासायनिक कंपन्यांमधील दूषित पाण्यावर प्रक्रिया करणारा २२ एलएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प (एसईटीपी) उभारण्यात आला आहे.
सर्व कारखान्यांमधील सांडपाणी पाइपलाइनद्वारे सीईटीपीमधील प्रक्रियाकृत सांडपाणी राष्ट्रीय समुद्री संस्थेने ठरवून दिलेल्या ठिकाणी वाघिवली खाडीमध्ये बंद पाइपलाइनद्वारे सोडणे आवश्यक आहे. परंतु प्रत्यक्षात अनेक कारखान्यांमधील पाणी थेट नदीमध्ये जात आहे. सीईटीपी केंद्रातील पाणीही प्रक्रिया न करताच नदीच्या पात्रामध्ये सोडले जात आहे.
१ ते १७ जुलै दरम्यान केंद्र बंदच होते. अशा प्रकारे केंद्र बंद असण्याची ही पहिलीच वेळ नाही. अनेक वेळा केंद्रामधील प्रक्रिया करण्याचे काम बंदच असते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पाहणीमध्येही ही गोष्ट निदर्शनास आली होती. अनेक वेळा याविषयी नोटीसही संबंधितांना दिल्या आहेत. सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी वारंवार फुटत आहे. चेंबर ओव्हरफ्लो झाल्यामुळे बऱ्याच वेळा सांडपाणी नाल्यातून नदीमध्ये जात आहे. नदीच्या पाण्यावर केमिकलचे काळे व निळे तरंग दिसत असतात. याशिवाय इतर ठिकाणच्या रासायनिक कंपन्यांमधील पाणी टँकरमधून आणून ते नदीमध्ये सोडले जात आहे.
औद्योगिक वसाहत सुरू झाल्यापासून नदीला प्रदूषणाचा विळखा वाढत गेला. आता तर नदीचे पात्र केमिकलचे पाणी वाहून नेण्यासाठीच असल्याप्रमाणे कामकाज सुरू आहे. या सर्वांचा परिणाम या परिसरातील कोळी बांधवांच्या रोजगारावर होत आहे. पडघा, तळोजा, नावडे, रोडपाली, कळंबोली, कोपरा, कामोठे, पेठ, मुर्बी, रांजनपाडा, शिरवली व इतर अनेक गावांमधील कोळी बांधव आजही मासेमारी करून जीवन जगत आहेत. परंतु नदीमधील प्रदूषणामुळे मत्स्यउत्पादन होतच नाही. शेतकऱ्यांनी नदीच्या पात्राला लागून तळी तयार केली आहेत.
या तळ्यांमध्ये मत्स्यशेती केली जात आहे. परंतु भरतीच्या दरम्यान केमिकलचे पाणी या तळ्यांमध्येही जात असून त्यामुळे मासे मरण्याची घटना वारंवार होत आहे. कोळी बांधवांनी कासाडी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी चळवळ सुरू केली
आहे. १५ वर्षांपासून पाठपुरावा सुरू असूनही शासन अद्याप लक्ष देत
नाही.
कडक कारवाई व्हावी
कासाडी नदी दूषित करण्याचे काम वर्षानुवर्षे सुरूच आहे. अनेक कारखान्यांमधील केमिकलमिश्रित पाणी नदी पात्रात सोडले जाते. तक्रारी करूनही काहीच कारवाई होत नाही. नदीचे अस्तित्व टिकविण्यासाठी व प्रदूषणाच्या विळख्यातून हा परिसर सोडविण्यासाठी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी या परिसरातील प्रकल्पग्रस्त कोळी बांधवांनी केली आहे.
कोळी बांधवांची कृती समिती
कासाडी नदीमधील प्रदुषण थांबविण्यासाठी कोळी बांधवांनी पुढाकार घेतला आहे. कोळी -मच्छीमार कृती समितीने याविषयी प्रदुषण नियंत्रण मंडळापासून राज्य शासनापर्यंत सर्व ठिकाणी पाठपुरावा सुरू केला आहे. नदीपात्रातील प्रदुषण थांबविण्यात यावे. प्रदुषण करणाऱ्या कारखाण्यांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. मासेमारी करणाऱ्या प्रकल्प्रग्रस्त शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
एमआयडीसीतील रसायनमिश्रित पाण्यामुळे कोळी बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. १५ वर्षांपासून आम्ही पाठपुरावा करत आहोत. नदीमध्ये मासे सापडणे दुर्मीळ झाले आहे. शेतकऱ्यांनी मत्स्यशेतीसाठी तयार केलेल्या तळ्यातही दूषित पाणी आल्याने मत्स्यशेती धोक्यात आली आहे. यामुळे नदीमध्ये दूषित पाणी सोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी.
- योगेश पगडे,
मच्छीमार, रोडपाली गाव
तळोजा औद्योगिक वसाहतीमधील जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम अधूनमधून बंद पडत आहे. जुलैमध्येही काही दिवस प्रकल्पाचे काम बंद होते. याविषयी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळालाही पत्र दिले आहे.
- सतीश शेट्टी, अध्यक्ष, उद्योजक संघटना
सीईटीपी प्रकल्प सुरू आहे. तो बंद पडला तर कारखाने चालू शकत नाहीत. शेट्टी हे पहिले या प्रकल्पाचे अध्यक्ष होते, परंतु त्यांना हटविल्यामुळे ते आरोप करत आहेत. कामगारांना हाताशी धरून केंद्र बंद पाडण्याचा डाव आम्ही हाणून पाडला असून हे केंद्र व्यवस्थित चालविले जाईल.
- जगदीश गायकवाड,
व्यवस्थापकीय संचालक,
सीईटीपी केंद्र तळोजा