पोलिसांची वेबसाईट एनआयसी सर्वरवर
By Admin | Updated: July 17, 2017 01:35 IST2017-07-17T01:35:11+5:302017-07-17T01:35:11+5:30
नवी मुंबई पोलिसांच्या वेबसाईटच्या होस्टिंगमध्ये बदल करण्यात येणार आहे. एचटीटीपीपेक्षा पीएचपी यूआरएलवर जास्त सुरक्षा

पोलिसांची वेबसाईट एनआयसी सर्वरवर
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांच्या वेबसाईटच्या होस्टिंगमध्ये बदल करण्यात येणार आहे. एचटीटीपीपेक्षा पीएचपी यूआरएलवर जास्त सुरक्षा असल्यामुळे हा बदल केला जाणार आहे. चालू महिन्यात दोनदा हॅकर्सने वेबसाईट हॅक केल्यामुळे सुरक्षेकरिता पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.
चालू महिन्यात दोनदा तुर्कीच्या हॅकर्सनी नवी मुंबई पोलिसांची वेबसाईट हॅक केली आहे. वेबसाईटची यूआरएल हॅक करून त्यावर तुर्कीचा झेंडा फडकवण्यात आलेला होता. मात्र दोन्ही वेळेस प्रकार निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी सुमारे अर्ध्या तासात वेबसाईट हॅकर्सच्या तावडीतुन मुक्त करून पूर्ववत केलेली आहे. पहिल्यांदा हॅकर्सने केलेल्या या खोडसाळ कृत्यानंतर पोलिसांनी वेबसाईटच्या सुरक्षेची काळजी घेतली होती. मात्र त्यानंतरही दुसऱ्यांदा हॅकर्सने त्यांचे कर्तृत्व सिद्ध करत पुन्हा वेबसाईट हॅक केली. यामुळे भविष्यात पुन्हा त्यांच्याकडून वेबसाईट हॅक केली जाऊ नये या दृष्टीने नवी मुंबई पोलिसांनी पाऊल उचलले आहे. पोलिसांची वेबसाईट सार्वजनिक वापरासाठी असल्याने त्यासाठी एचटीटीपी यूआरएल वापरण्यात आला होता. मात्र या सर्वरवर उच्च दर्जाची सुरक्षा नसल्याचे हॅकर्सनी सिद्ध करून दाखवले आहे. ही बाब नवी मुंबई पोलिसांनी गांभीर्याने घेवून यूआरएलमध्ये बदल करण्याचे ठरवले आहे. गुन्हे शाखा उपआयुक्त तुषार दोशी यांनी त्यास दुजोरा दिला आहे.
नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटरवर (एनआयसी) वापरल्या जाणाऱ्या पीएचपी सर्वरवर वेबसाईटच्या सुरक्षेची जास्त खात्री असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. यासंबंधीची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर वेबसाईट हॅक होण्याचे टळेल असा पोलिसांचा विश्वास आहे. कोणतीही यूआरएल वापरली तरी, सर्वरचा फायरवॉल सक्षम असल्याशिवाय हॅकर्सला आळा बसणार नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.