कल्याण निधीसाठी पोलिसांचा ‘उत्सव‘
By Admin | Updated: March 21, 2017 02:09 IST2017-03-21T02:09:07+5:302017-03-21T02:09:07+5:30
पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता कल्याण निधी संकलनासाठी नवी मुंबई पोलिसांतर्फे ‘उत्सव २०१७’ या भव्य कार्यक्रमाचे

कल्याण निधीसाठी पोलिसांचा ‘उत्सव‘
नवी मुंबई : पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता कल्याण निधी संकलनासाठी नवी मुंबई पोलिसांतर्फे ‘उत्सव २०१७’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नेरुळच्या डी.वाय. पाटील स्टेडिअमवर झालेल्या या कार्यक्रमास सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी उपस्थित राहून प्रेक्षकांची मने जिंकली. या वेळी कर्तव्य बजावताना अपघाती मृत्यू झालेल्या दोघा पोलिसांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते आर्थिक मदत करण्यात आली.
पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या कल्याणाकरिता नवी मुंबई पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. पोलिसांच्या कुटुंबीयांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे, पोलीस पुत्रांसाठी अभ्यासिका बांधणे अशा कामांचा यामध्ये समावेश आहे. त्यासाठी निधी उभा करण्याच्या उद्देशाने शनिवारी ‘उत्सव २०१७’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमास पोलीस महासंचालक सतीश माथुर, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस प्रामुख्याने उपस्थित होते. त्याशिवाय ज्येष्ठ सिनेअभिनेते बोमन ईराणी, सचिन पिळगावकर, गुलशन ग्रोवर, विवेक ओबेरॉय, साजीद नाडीयादवाला, मृणाल कुलकर्णी, रश्मी देसाई, गणेश आचार्य, वैशाली सामंत, वैशाली माडे यांनी देखील कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती. त्यापैकी अनेकांनी मंचावर आपली नृत्याची व गायनाची कला सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.
कार्यक्रमादरम्यान दीपक डोंगरे व मधुकर पागी या नवी मुंबई पोलीस दलातील दोघा मृत पोलिसांच्या कुटुंबीयांना अनुक्रमे २५ लाख व १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. या वेळी अमृता फडणवीस यांनी शहिदांच्या पत्नींना धीर देत, पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले. तर प्रत्येक पोलिसांपेक्षा त्यांच्या कुटुंबीयांचे राज्य व देशासाठी मोठे योगदान असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. तर अभिनेता विवेक ओबेरॉय याने स्वत:च्या गृहप्रकल्पांची माहिती देत शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांकरिता प्रत्येक प्रकल्पात २५ घरे मोफत देण्याची घोषणा केली.