पोलिसांकडून छपरी दुचाकीस्वारांवर कारवाई; वाशीतील प्रकार, मोटरसायकल जप्त 

By सूर्यकांत वाघमारे | Published: February 19, 2024 06:19 PM2024-02-19T18:19:26+5:302024-02-19T18:21:18+5:30

सायलेन्सर बदलून कर्णकर्कश आवाज काढणाऱ्या दुचाकीस्वारांवर वाशी पोलिसांनी कारवाई केली.

Police action against bike man in Vashi, motorcycle seized | पोलिसांकडून छपरी दुचाकीस्वारांवर कारवाई; वाशीतील प्रकार, मोटरसायकल जप्त 

पोलिसांकडून छपरी दुचाकीस्वारांवर कारवाई; वाशीतील प्रकार, मोटरसायकल जप्त 

नवी मुंबई: सायलेन्सर बदलून कर्णकर्कश आवाज काढणाऱ्या दुचाकीस्वारांवर वाशी पोलिसांनी कारवाई केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने वाशीत पोलिसांचा बंदोबस्त होता. यावेळी पोलिसांसमोरच छपरीगिरी करणारा एक दुचाकीस्वार कोसळला असता तो पोलिसांच्या हाती लागला. तर एकाचा पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले. 

तरुणांमध्ये दुचाकींचे सायलेन्सर बदलून कर्णकर्कश आवाज काढणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. या छपरी संस्कृतीचे लोन तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरत आहे. अशा दुचाकी रस्त्याने धावत असताना त्यांच्या आवाजामुळे इतरांच्या कानठळ्या बसतात. परंतु अनेक दुचाकींच्या नंबरप्लेट काढल्या जात असल्याने पोलिसांना त्या मिळून येत नाहीत. मात्र सोमवारी वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलिसांसमोरच कर्णकर्कश आवाज काढत दुचाकी पळवणे तरुणांना चांगलेच महागात पडले. मिरवणुकीत सहभागी असलेले दोन्ही तरुण दुचाकीतून मोठ्याने आवाज काढत दुचाकी पळवत होते. यामध्ये चौकात वळण घेताना एकजण पडला असता पोलिसांच्या हाती लागला.

तर दुसऱ्याला पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. दोन्ही दुचाकींच्या नंबरप्लेट काढण्यात आल्या होत्या. शिवाय मूळ सायलेन्सर बदलून कर्णकर्कश आवाज काढणारे सायलेन्सर बसवण्यात आले होते. कारवाईसाठी त्यांना वाशी पोलिस व वाहतूक पोलिस ताब्यात घेत असताना एकाने दुचाकी सोडून पळ काढला तर एकाला ताब्यात घेतले आहे. दोघांवरही वाशी पोलिस ठाण्यात कारवाई करण्यात आली आहे. 

Web Title: Police action against bike man in Vashi, motorcycle seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.