सायन-पनवेल महामार्गावर महापालिका वृक्ष लागवड करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:53 IST2019-06-03T00:53:01+5:302019-06-03T00:53:15+5:30
प्रस्ताव स्थायी समितीकडे : ५७ लाख ४९ हजार रुपये खर्च होणार

सायन-पनवेल महामार्गावर महापालिका वृक्ष लागवड करणार
नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावर वृक्षलावगड करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी ५७ लाख ४९ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. याविषयीचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये पाठविण्यात आला आहे.
नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने पर्यावरण रक्षणासाठी शहरामध्ये जास्तीत जास्त वृक्षलावगड व हिरवळ विकसित करण्यास सुरुवात केली आहे. सद्यस्थितीमध्ये दिघा ते बेलापूर दरम्यान २०० पेक्षा जास्त उद्यान व हरित पट्टे आहेत. पामबीच व ठाणे-बेलापूर रोडच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली आहे, यामुळे हवेतील धूलिकणांचे प्रमाण कमी करण्यात यश आले आहे.
जुईनगर रेल्वेस्टेशन व पामबीच रोडवर ज्वेल्सच्या काही भागात वृक्षांच्या सावलीमुळे उन्हाच्या झळा बसत नाहीत. याच धर्तीवर शहरात इतर ठिकाणी हरित पट्टे विकसित केले जात आहेत. सायन-पनवेल महामार्गावरही वृक्ष लावगड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाशी ते बेलापूर दरम्यान रोडच्या दोन्ही बाजूला पावसाळ्यात ही वृक्षलावगड केली जाणार आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला हरित पट्टे विकसित झाले नसल्यामुळे त्याचा पर्यावरणावर परिणाम होऊ लागला आहे. धूलिकणांचे प्रमाण या परिसरात जास्त आहे. या परिसरामध्ये वृक्षलावगड करण्यासाठी पुरेशी जागाही उपलब्ध असल्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात ही वृक्षलागवड केली जाणार आहे.
गेल्या वर्षी मिळाली प्रशासकीय मंजुरी
महापालिकेने मे २०१८ मध्ये यासाठी सर्वसाधारण सभेची प्रशासकीय मंजुरी घेतली होती. यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून, जी अॅण्ड जी कंपनीने सर्वात कमी दर सादर केले आहेत. अंदाजपत्रकीय दरापेक्षा एक टक्का कमी दराने निविदा सादर केली आहे. वृक्ष लागवड व संवर्धनासाठी ५७ लाख ४९ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. येणाºया स्थायी समितीमध्ये हा प्रस्ताव मंजुरीसाठी येणार आहे.