लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : एपीएमसी परिसरात पोलिसांनी बुधवारी रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवून ११ लाखाच्या ड्रग्स सोबतच एक पिस्तूल हस्तगत केली आहे. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याशिवाय इतरही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून पोलिसांनी गुन्हेगारांवर कारवाईसाठी कंबर कसली आहे. यासाठी पोलिसांमार्फत ठिकठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवले जात आहेत. त्यानुसार उपायुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजय शिंदे यांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवले. त्यासाठी मुख्यालयाचे देखील पोलिस बळ पुरवण्यात आले होते. त्यांनी तुर्भे गाव, एपीएमसी, कोपरी परिसरात गुन्हेगारांचे अड्डे, ड्रग्स विक्रेते यांच्या ठिकाणांवर धाडी टाकल्या. शिवाय संशयित व्यक्तींची, वाहनांची देखील झाडाझडती घेतली. त्यामध्ये पोलिसांच्या हाती ११ लाखाचे एमडी ड्रग्स, एक देशी बनावटीचे पिस्तूल हाती लागले आहे.
एकता नगर झोपडपट्टी परिसरात पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ५ लाख ४४ हजार रुपये किमतीचे एमडी मिळून आले. याप्रकरणी रुना शेख, धनलक्ष्मी स्वामी, रेखा शेख व रुबिना शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ग्रीन पार्क झोपडपट्टी परिसरात पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ५ लाख ५५ हजार रुपये किमतीचे एमडी मिळून आले आहे. याप्रकरणी अकबर शेख, जुगल शेख, दिलीप राठोड, रशिदा शेख व तस्लिमा खातून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तुर्भे रेल्वे स्थानक परिसरातुन पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या एकावर कारवाई करण्यात आली आहे. हबीब मतेबुल शेख (३४) असे त्याचे नाव आहे. तुर्भे रेल्वेस्थानक परिसरात तो येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याद्वारे पथकाने त्याठिकाणी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल जप्त केले आहे. त्याशिवाय हद्दपार केल्यानंतरही परिसरात वावरणाऱ्या दोघांवर कारवाई केली आहे. तर एकाकडून तलवार जप्त केली आहे.