फडके नाट्यगृह बनले कार वॉशिंग सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 23:47 IST2019-08-30T23:47:48+5:302019-08-30T23:47:53+5:30
नळाला पाइपची जोडणी करून गाडी धूत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

फडके नाट्यगृह बनले कार वॉशिंग सेंटर
पनवेल : महापालिकेच्या मालकीचे फडके नाट्यगृह हे कार धुण्याचे सेंटर बनले आहे की काय ? असा प्रश्न सध्याच्या घडीला नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शहराला एकीकडे अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न भेडसावत असताना पालिकेचा वाहनचालक सर्रास नळाला पाइपची जोडणी करून गाडी धूत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
पनवेल महापालिका असे ठळकपणे लिहिलेल्या एमएच ४६ बीए ५७३० या क्रमांकाची गाडी सर्रास धुताना दिसतात. अशाप्रकारे नळाला पाइपद्वारे जोडणी करून शेकडो लीटर पाणी वाया घालविले जात आहे. विशेष म्हणजे नाट्यगृह व्यवस्थापनाद्वारे सक्त निर्देश देऊन देखील कर्मचारी अशाप्रकारे पाण्याची नासाडी करत असल्याचे पहावयास मिळते.
या प्रकाराबाबत फडके नाट्यगृहाचे व्यवस्थापक अरुण कोळी यांना विचारणा केली असता संबंधित प्रकार गंभीर आहे. आम्ही यापूर्वीच अशाप्रकारे पाण्याची नासाडी करू नये अशा सूचना कर्मचाऱ्यांना केली आहे. तरी देखील अशाप्रकारे सूचनांकडे दुर्लक्ष होत असेल तर वरिष्ठांना याबाबत माहिती दिली जाईल.