थकीत रक्कम भरण्याची मुदत संपली; सिडकोच्या विविध गृहप्रकल्पातील सदनिकांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 00:22 IST2019-03-26T00:22:08+5:302019-03-26T00:22:22+5:30
सिडकोच्या माध्यमातून विविध नोडमध्ये बांधण्यात आलेल्या गृहप्रकल्पातील यशस्वी अर्जदारांना आपल्या थकीत रकमेचा भरणा करण्यासाठी दिलेली मुदत सोमवारी संपुष्टात आली.

थकीत रक्कम भरण्याची मुदत संपली; सिडकोच्या विविध गृहप्रकल्पातील सदनिकांचा समावेश
नवी मुंबई : सिडकोच्या माध्यमातून विविध नोडमध्ये बांधण्यात आलेल्या गृहप्रकल्पातील यशस्वी अर्जदारांना आपल्या थकीत रकमेचा भरणा करण्यासाठी दिलेली मुदत सोमवारी संपुष्टात आली. त्यामुळे सोमवारी अखेरच्या दिवशी पैसे भरण्यासाठी ग्राहकांनी सिडकोच्या संबंधित कार्यालयात गर्दी केली होती.
विशेष म्हणजे डिफॉल्डर ठरलेल्या ग्राहकांसाठी ही अंतिम मुदत होती. त्यामुळे या मुदतीत ज्यांनी पैशाचा भरणा केला नाही, त्यांच्या घराचे वाटप रद्द करण्यात येणार आहे.
सिडकोच्या माध्यमातून मागील दहा वर्षांत विविध नोडमध्ये विविध गृहप्रकल्पांची निर्मिती करण्यात आली आहे. यात विशेषत: स्वप्नपूर्ती, उन्नती, व्हॅलीशिल्प तसेच खारघर येथील केएच-१ व केएच-२ प्रकारातील घरांचा समावेश आहे. या गृहप्रकल्पात यशस्वी ठरलेल्या ग्राहकांना विहित मुदतीत घराचे पैसे भरणे बंधनकारक असते. परंतु अनेक ग्राहकांनी या निर्धारित वेळेत पैसे न भरल्याने सिडकोने त्यांना डिफॉल्डर म्हणून घोषित केले होते. सिडकोच्या माहितीनुसार अशाप्रकारचे २५0 ग्राहक आहेत. या ग्राहकांना पैसे भरण्यासाठी वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने या घरांचे करायचे काय, असा प्रश्न सिडकोला सतावत होता. अखेर सिडकोच्या संचालक मंडळाने या ग्राहकांना पैसे भरण्यासाठी १ जानेवारी ते २५ मार्चपर्यंत चौथ्यांदा मुदतवाढ दिली. ही अखेरची मुदत असल्याने ग्राहकांनी आपल्या थकीत रकमेचा भरणा करण्याचे आवाहन सिडकोकडून करण्यात आले होते. ही मुदत सोमवारी संपली आहे. तीन महिन्याच्या कालावधीत ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. अखेरच्या दिवशी ग्राहकांनी पैसे भरण्यासाठी पणन विभागात गर्दी केली होती. त्यामुळे कार्यालय संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आले होते. दरम्यान, विविध कारणांमुळे घरांचे पैसे भरू न शकलेल्या यशस्वी अर्जदारांना ही अखेरची संधी होती. त्यानुसार ग्राहकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. ज्या ग्राहकांनी या मुदतीत पैशाचा भरणा केला नाही, त्यांचे वाटपपत्र रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असे सिडकोच्या पणन विभाग (२) चे व्यवस्थापक लक्ष्मीकांत डावरे यांनी स्पष्ट केले आहे.
पैसे न भरल्यास वाटपपत्र रद्द करण्याची कारवाई
विविध कारणांमुळे घरांचे पैसे भरू न शकलेल्या यशस्वी अर्जदारांना ही अखेरची संधी होती. ज्यांंनी मुदतीत पैशाचा भरणा केला नाही, त्यांचे वाटपपत्र रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असे सिडकोच्या पणन विभाग (२) चे व्यवस्थापक लक्ष्मीकांत डावरे यांनी स्पष्ट केले आहे.