पालिका मुख्यालयात पार्टी?; कँटीनसमोरील आवारात बीअरचे रिकामे टिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 00:32 IST2019-01-03T00:32:36+5:302019-01-03T00:32:49+5:30
नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात बीअरचे रिकामे टिन आढळल्याने मुख्यालयात ३१ डिसेंबरची पार्टी झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मुख्यालयाची सुरक्षा यंत्रणा तकलादू असल्याने याआधीही मुख्यालयातील पत्रकार कक्षात जळालेली बिडी सापडण्याचा प्रकार घडला आहे.

पालिका मुख्यालयात पार्टी?; कँटीनसमोरील आवारात बीअरचे रिकामे टिन
- योगेश पिंगळे
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात बीअरचे रिकामे टिन आढळल्याने मुख्यालयात ३१ डिसेंबरची पार्टी झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मुख्यालयाची सुरक्षा यंत्रणा तकलादू असल्याने याआधीही मुख्यालयातील पत्रकार कक्षात जळालेली बिडी सापडण्याचा प्रकार घडला आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाची इमारत ही आयकॉनिक इमारत म्हणून ओळखली जाते. मुख्यालय पाहण्यासाठी अनेक नागरिक या इमारतीमध्ये येतात. खाडीकिनाऱ्यालगत असलेल्या या इमारतीमध्ये सुरक्षा यंत्रणा तकलादू आहे. मुख्यालयात आलेल्या वाहनांची कोणतीही तपासणी अथवा विचारपूस न करता केवळ वाहनांचा क्र मांक नोंद केला जातो आणि वाहने मुख्यालयाच्या आवारात सोडली जातात. प्रवेशद्वारावर वाहनांची तपासणी करणारी अद्ययावत यंत्रणा बसविण्यातच आलेली नाही, त्यामुळे कोणत्याही वाहनांना सहज प्रवेश मिळविता येतो, तसेच वाहने पार्किंग केल्यावर तळमजल्यावरून जिना किंवा लिफ्टने मुख्यालयातील कोणत्याही मजल्यावर कोणत्याही तपासणीशिवाय प्रवेश मिळत आहे, त्यामुळे मुख्यालयाची सुरक्षा धोक्यात आली आहे. गेल्या महिन्यात पालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षात जळालेली बिडी आढळली होती. सीसीटीव्हीच्या मदतीने त्याची तपासणी केली असता सीसीटीव्ही कॅमेºयामध्ये फक्त लाइव्ह दिसत असून, रेकॉर्डिंग होत नसल्याचे समोर आले आहे. या घटनेननंतर आता पत्रकार कक्षातील सीसीटीव्ही कॅमेºयाचे रेकॉर्डिंग सुरू करण्यात आले आहे. बुधवार, २ जानेवारी रोजी पालिका मुख्यालयातील कँटीनसमोरील बंद असलेल्या आपत्कालीन दरवाजासमोर बीअरचा टिन आढळला आहे, यामुळे ३१ डिसेंबरची पार्टीदेखील मुख्यालयात साजरी झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मुख्यालयात धूम्रपान करणे किंवा मद्यपान करणे हे मुख्यालयाच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याचे असून, महापालिका प्रशासनाने मुख्यालय परिसरात अद्ययावत सुरक्षा यंत्रणा राबविण्याची मागणी केली जात आहे.
महापालिकेच्या मुख्यालयात अशा गोष्टी आढळणे गंभीर बाब असून, कँटीन समोर आढळल्याने कँटीनचालक आणि मुख्यालयाचे सुरक्षारक्षक यांना सूचना देण्यात येतील.
- रवींद्र पाटील,
अतिरिक्त आयुक्त