शहरात पार्किंग, मार्केटचा प्रश्न गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:08 IST2019-01-14T00:08:11+5:302019-01-14T00:08:36+5:30
सिडकोची उदासीनता : आरक्षित भूखंडांचे हस्तांतर रखडल्याने नवी मुंबई महापालिका हतबल

शहरात पार्किंग, मार्केटचा प्रश्न गंभीर
- योगेश पिंगळे
नवी मुंबई : शहरात सध्या अनधिकृत फेरीवाल्यांनी संख्या वाढली आहे. परिणामी पार्किंगचा बोजवारा उडाला आहे. पार्र्किंगसाठी पुरेशा जागा नसल्याने महापालिका हतबल झाली आहे. विशेष म्हणजे, पार्किंग व मार्केटसह विविध सामाजिक प्रयोजनासाठी आरक्षित भूखंडांचे हस्तांतरण व्हावे, यासाठी महापालिकेने सिडकोकडे तगादा लावला आहे; परंतु सिडकोच्या उदासीनतेमुळे भूखंड हस्तांतरणाचा मुद्दा बारगळल्याने पार्किंग व मार्केटचा प्रश्न गंभीर होताना दिसत आहे.
मुंबईतील वाढत्या लोकसंख्येस नियंत्रित करण्यासाठी स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांसाठी पर्यायी शहराची निर्मिती करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या मालकीचा उपक्र म असलेल्या सिडकोने नवी मुंबई शहराची निर्मिती करताना शहरातील नागरिकांना सामाजिक सुविधा देण्याच्या दृष्टीने विविध प्रयोजनांसाठी भूखंड आरक्षित ठेवले आहेत. १९९२ साली नवी मुंबई महापालिकेची स्थापना झाल्यावर अनेक भूखंड महापालिकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत; परंतु शहरात विविध प्रयोजनासाठी आरक्षित असलेले सुमारे ५९६ सामाजिक सुविधांचे भूखंड सिडकोकडे आहेत. शहरातील नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याने सिडकोने महापालिकडे हस्तांतरित केलेल्या सामाजिक सुविधांचे भूखंड विविध कामांसाठी अपुरे पडू लागले आहेत. यासाठी सिडकोकडे असलेल्या भूखंडांची मागणी सातत्याने महापालिकडे करण्यात येत आहे; परंतु सिडको याकडे दुर्लक्ष करीत आहे, त्यामुळे शहरातील नागरिकांना विविध समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावू लागल्या आहेत. शहरात मार्केट आणि वाहने पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे.
पार्किंगसाठी सिडकोकडून ५८ भूखंड महापालिकडे हस्तांतरित झाले असून, आणखी १५ भूखंडांची मागणी महापालिका सिडकोकडे करीत आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर शहरात वाहने पार्किंगची संख्यादेखील मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सिडकोने अनेक गृहसंस्था निर्माण करताना वाहने पार्किंगसाठी जागा ठेवलेली नाही. शहरातील प्रकल्पग्रस्त नागरिकांनाही साडेबारा टक्के भूखंडातील सामाजिक सुविधांसाठी राखून ठेवलेल्या सुमारे पावणेचार टक्के भूखंडांचेही वाटप झाले नाही, त्यामुळे शहरातील कॉलनी बरोबर गाव-गावठाण आणि झोपडपट्टी भागात पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली असून रस्त्याच्या कडेला, मैदानांमध्ये वाहने उभी करावी लागत आहेत, त्यामुळे अपघात आणि वाहतूककोंडीच्या निर्माण होत आहे.
च्भूखंडावर कचरा
सिडकोने विविध प्रयोजनासाठी आरक्षित ठेवलेल्या आणि महापालिकडे हस्तांतरित न केलेल्या भूखंडांवर डेब्रिज आणि कचरा मोठ्या प्रमाणावर पडला असून अनेक भूखंडांवर अतिक्र मण झाले आहे, तर काही भूखंडांवर अतिक्र मण होण्याची शक्यता आहे. शहरात मार्केटसाठी राखीव भूखंडांपैकी ८४ भूखंड सिडकोकडून महापालिकेकडे हस्तांतरित झाले असून, अद्याप ४० भूखंडांची मागणी महापालिका सिडकोकडे करीत आहे. मार्केटच्या समस्येमुळे शहर स्वच्छतेलाही बाधा पोहोचत आहे. बेकायदेशीर फेरीवाल्यांनी पदपथ आणि रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर बाजार मांडला जात आहे, त्यामुळे नागरिकांना पदपथावरून चालताना विविध समस्यांना सामना करावा लागत असून, वाहतूककोंडीच्या समस्याही निर्माण होत आहेत.