पनवेलची शैक्षणिक परंपरा १६८ वर्षांची

By Admin | Updated: March 18, 2016 00:24 IST2016-03-18T00:24:12+5:302016-03-18T00:24:12+5:30

पनवेलला शेकडो वर्षांपासून व्यापारी व शैक्षणिक दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. शहरात १ एप्रिल १८४८ मध्ये पहिली शाळा सुरू झाली. १८७३ मध्ये मुलींसाठी स्वतंत्र शाळा सुरू करण्यात

Panvel's educational tradition is 168 years old | पनवेलची शैक्षणिक परंपरा १६८ वर्षांची

पनवेलची शैक्षणिक परंपरा १६८ वर्षांची

नवी मुंबई : पनवेलला शेकडो वर्षांपासून व्यापारी व शैक्षणिक दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. शहरात १ एप्रिल १८४८ मध्ये पहिली शाळा सुरू झाली. १८७३ मध्ये मुलींसाठी स्वतंत्र शाळा सुरू करण्यात आली. तत्कालीन लोकप्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यापासून सुरक्षेसाठीही उपाययोजना केली होती. १६८ वर्षांपूर्वी शिक्षणाचा श्रीगणेशा केल्यामुळेच आज शहराला शैक्षणिक हबचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
राज्यात पुरोगामी दृष्टिकोन ठेवून शैक्षणिक, सामाजिक विकास करणाऱ्या शहरांमध्ये पनवेलचा अग्रक्रमांक आहे. शहरातील मुलांना चांगले आधुनिक शिक्षण मिळावे याकडे लक्ष दिले होते. इंग्रजांनी १८३५ मध्ये भारतामध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला.
पनवेल नगरपालिकेची स्थापना होण्यापूर्वीच येथील नागरिकांनी १ एप्रिल १८४८ मध्ये पहिली मराठी शाळा सुरू केली. मुलींच्या शिक्षणासाठीही विशेष पुढाकार घेतला होता. १८७१ मध्ये शाळा क्रमांक १ मध्ये ३२ विद्यार्थिनी असल्याची नोंद शिक्षण विभागाच्या दप्तरी आहे. त्यापूर्वी मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली झाली होती. शाळांमधील मुलींची संख्या वाढू लागल्यामुळे १८७३ मध्ये पहिली मुलींची शाळा सुरू करण्यात आली. सुरवातीला सहावीपर्यंत शिक्षणाची सोय होती. सुरवातीला पुराणीकांच्या इमारतीमध्ये शाळा भरत होती. १९५४ मध्ये पी.एस. सी. च्या परीक्षेमध्ये या शाळेतील विद्यार्थिनी विजया गोविंद मराठे हिने ७४ टक्के गुण मिळवून विक्रम केला होता. मराठी माध्यमाच्या मुलांच्या व मुलींच्या शाळेबरोबर उर्दू व गुजराती माध्यमाच्या शाळाही सुरू केल्या होत्या. स्वातंत्र्यापूर्वी १९४५ मध्ये शहरात पहिले महाविद्यालय सुरू झाले.
शहरातील गरीब विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनाही येथील शिक्षण संस्थांनी सुरू केली होती. गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यासाठी शहरातील शिक्षक सीताराम जनार्दन पटवर्धन यांनी पुअर बॉईज फंडची स्थापना केली. या योजनेअंतर्गत गरीब मुलांना मोफत पुस्तके उपलब्ध करून दिली जात होती. या योजनेची माहिती सर्वत्र व्हावी यासाठी १९५४ मध्ये केसरी, राष्ट्रतेज व इतर दैनिकांमध्ये जाहिरात देण्यात आली होती. तेव्हाही शहरातील ५०० ते ६०० विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याची नोंद आहे. (प्रतिनिधी)

मुुंबईसारख्या महानगरामध्ये आजही शाळांमध्ये प्रोजेक्टर व इतर अत्याधुनिक साधने नाहीत. राज्यातील व देशातील इतर शहरांचीही अशीच स्थिती आहे. परंतु पनवेलमधील कोकण एज्युकेशन संस्थेच्या शाळेमध्ये १९४४ ते १९४८ च्या दरम्यान सोळा मिलीमीटरचा प्रोजेक्टर (चलचित्र दाखविणारे यंत्र ) बसविण्यात आला होता. शाळेत बसविलेला हा पहिलाच प्रोजेक्टर असण्याची शक्यता आहे. तेव्हाच नगरपालिकेने शाळेमध्ये टेपरेकॉर्डर घेण्यासाठीही अनुदान दिले होते.

विद्यार्थिनींची सुरक्षा
पनवेलमधील शाळा क्रमांक १ मध्ये १८७१ मध्ये मुलींची संख्या ३२ होती. पनवेल व्यापारी पेठ असल्याने श्रीमंत मुली दागिने घालून शाळेत यायच्या. मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी तेव्हाच्या व्यवस्थापनाने घेतली होती. मुलींना शाळेत आणणे व नेण्यासाठी पाच रुपये पगाराने शिपायाची व्यवस्थाही केली होती.

देशप्रेमी शिक्षक व गुणवंत विद्यार्थी
गोवा मुक्ती संग्रामात शहीद हिरवे गुरुजी हे येथील प्राथमिक मराठी शाळेत शिक्षक होते. १९४८ मध्ये पी. डी. अत्रे या विद्यार्थ्याने मुंबई विद्यापीठात ९ वा क्रमांक मिळविला. १९५४ मध्ये विजया मराठेने ७४ टक्के गुण मिळवले.

Web Title: Panvel's educational tradition is 168 years old

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.