पनवेल मनपासमोर नालेसफाईचे आव्हान, पावसाळापूर्व नालेसफाईचे काम धीम्या गतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 07:01 IST2018-05-08T07:01:56+5:302018-05-08T07:01:56+5:30
पावसाळापूर्व नालेसफाईची कामे मुदतीमध्ये पूर्ण करण्याचे आव्हान महापालिकेसमोर उभे राहिले आहे. अत्यंत धीम्या गतीने नालेसफाईची कामे सुरू आहेत. सिडको नोडसह गावठाणांमध्ये अद्याप कामे सुरू झालेली नाहीत.

पनवेल मनपासमोर नालेसफाईचे आव्हान, पावसाळापूर्व नालेसफाईचे काम धीम्या गतीने
- वैभव गायकर
पनवेल - पावसाळापूर्व नालेसफाईची कामे मुदतीमध्ये पूर्ण करण्याचे आव्हान महापालिकेसमोर उभे राहिले आहे. अत्यंत धीम्या गतीने नालेसफाईची कामे सुरू आहेत. सिडको नोडसह गावठाणांमध्ये अद्याप कामे सुरू झालेली नाहीत. नैसर्गिक नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून सर्व कामे वेळेत पूर्ण करताना प्रशासनास तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
पनवेल शहरात पटेल मोहल्ला, उरण नाका, श्रेयस हॉस्पिटलजवळील नाला हे महत्त्वाचे नाले आहेत. या नाल्यातून पावसाचे पाणी खाडीला मिळत असते. सध्याच्या घडीला पनवेल शहरात पॉवर हाउस ते कच्छी मोहल्ला या नाल्याच्या सफाईचे काम पालिकेने सुरू केले आहे. उर्वरित ठिकाणी अद्याप कामे सुरू झालेली नाहीत. पनवेल शहरात पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे प्रकार वारंवार घडत असतात. यामध्ये महाराष्ट्र बँक, मोमीन पाडा, टपाल नाका, मिडलक्लास सोसायटीचा काही भाग, कच्छी मोहल्ला, वाल्मीकी नगर तसेच पायोनियर परिसरात देखील पावसाळ्यात पाणी तुंबत असते. सद्यस्थितीमध्ये नालेसफाईचे काम ज्या गतीने सुरू होणे अपेक्षित आहे त्या गतीने दिसून येत नाही. आयुक्त गणेश देशमुख यांनी पालिकेचे सर्व अधीक्षक यांना नालेसफाईचे काम मुदतपूर्व पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पनवेल महानगर पालिका क्षेत्रात खारघर, कळंबोली, कामोठे, खांदा वसाहत, तळोजा आदी नोडचा समावेश आहे. याव्यतिरिक्त पूर्वाश्रमीच्या २९ ग्रामपंचायतीदेखील पालिकेत समाविष्ट आहेत. गावठाण परिसरामध्ये नालेसफाई सुरू झालेली नाही. खारघर शहरातील कोपरा पुलाजवळील मुख्य नाला, खारघर सेक्टर ८, २, १0 जवळील नाल्यांचे काम देखील सिडकोने अद्याप हाती घेतलेले नाही.
पालिका कार्यक्षेत्रामध्ये पूर्वा एजन्सी मनुष्यबळ पुरविण्याचे काम करत आहे. पालिका हद्दीतील प्रत्येक अधीक्षकाला १५ कर्मचारी , १ जेसीबी व १ डंपर आदींची पूर्तता करण्यात आलेली आहे. यंदा मान्सून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असल्याने पालिकेसमोर या सर्व नाल्यांची मुदतपूर्व सफाई करणे आव्हान असणार आहे.
दरवर्षी पनवेलमध्ये पाणी पाणी होत असतेच यावर्षी चित्र बदलणार आहे का ? याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने २९ तारखेपर्यंत आचारसंहिता लागू असल्याने पालिकेमार्फत याकरिता नव्याने टेंडर प्रक्रि या काढता येणार नसल्याने आचारसंहितेमुळे ही कामे उशिरा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मान्सूनपूर्व नालेसफाई एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणे गरजेचे असते. सर्व अधीक्षकांना यासंदर्भात आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.मान्सूनपूर्व कामे २५ मेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. पावसाळ्यापूर्वी पालिका हद्दीतील सर्व कामे पूर्ण होतील.
- गणेश देशमुख, आयुक्त,
पनवेल महानगर पालिका
महत्त्वाचे नाले : पनवेल शहरात पटेल मोहल्ला नाला, उरण नाका, श्रेयस हॉस्पिटलजवळील हे नाले शहरातील मुख्य नाले आहेत. खारघर शहरात कोपरा पूल, सेक्टर १0, २, ८ तर खांदा वसाहत येथील बालभारती येथील नाला हा महत्त्वाचा नाला आहे. या नाल्यांची लवकरात लवकर साफसफाई होणे गरजेचे आहे.
विरोधी पक्षनेत्यांचे आयुक्तांना पत्र
शहरात अपुऱ्या पाणीपुरवठ्याची समस्या नियोजनाच्या अभावामुळे उद्भवली. तशीच अवस्था मान्सूनपूर्व कामात उद्भवणार नाही याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी. ठेकेदारांमार्फत योग्यरीत्या कामे करून घ्यावीत, जेणेकरून शहरात पाणी साचण्याचे प्रकार होणार नाहीत. याकरिता विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी आयुक्त गणेश देशमुख यांना पत्र लिहिले आहे.
पुष्पकनगरच्या भरावाचा फटका बसण्याची शक्यता
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भरावाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याचाच भाग असलेल्या पुष्पक नगरच्या भरावाचे काम पूर्ण झाले असल्याने या परिसराची उंची दहा फुटापेक्षा जास्त वाढली आहे. विशेष म्हणजे या भरावामुळे पनवेल शहर खाली आले असल्याने या भरावाचा फटका शहराला बसण्याची शक्यता आहे. भरती आणि मुसळधार पाऊस एकाच वेळेला आल्यास मोहल्ला, कोळीवाडा, मिरची गल्ली परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबून पूरसदृश स्थिती निर्माण होईल अशी शक्यता माजी नगरसेवक लतीफ शेख यांनी व्यक्त केला आहे. सिडको आणि पालिका प्रशासनाकडे अनेक वेळा पत्रव्यवहार करून देखील त्यांनी या अतिशय गंभीर विषयाकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप शेख यांनी केला आहे.
२९ गावांत अद्याप कामाला सुरु वात नाही
पनवेल महानगर पालिका हद्दीत २३ ग्रामपंचायतीमधील २९ गावांचा समावेश आहे. याठिकाणच्या एकाही गावात अद्याप मान्सूनपूर्व नालेसफाई, गटार सफाईला सुरु वात केली गेली नाही. यापैकी अनेक गावे सिडको नोडलगत खोलगट भागात असल्याने पावसाळ्यात याठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रकार घडत असतात.