महिलांसाठी स्पर्धा उपक्रमाचे आयोजन
By Admin | Updated: December 13, 2015 00:25 IST2015-12-13T00:25:51+5:302015-12-13T00:25:51+5:30
महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने ३ जानेवारी २०१६ रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील

महिलांसाठी स्पर्धा उपक्रमाचे आयोजन
नवी मुंबई : महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने ३ जानेवारी २०१६ रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील महिला व बालकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नोंदणीकृत महिला संस्था/ महिला मंडळ यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.
याकरिता एनएमएमसी क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणारी महिला मंडळे / संस्था यांच्याकडून पुरस्कारासाठी विहित नमुन्यात नामांकने मागविण्यात येत असून, विहित नमुन्यातील अर्ज आठही विभाग कार्यालयांत तसेच योजना विभाग, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, तळमजला, से. १५ए, सीबीडी बेलापूर येथे उपलब्ध आहेत. पुरस्काराकरिता सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्थांनी आपले अर्ज २३ डिसेंबर २०१५ रोजीपर्यंत सादर करावयाचे आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील महिला व बालकल्याण घटकांतर्गत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिनानिमित्त विविध स्पर्धा आयोजित करण्यात येत असून, या स्पर्धांकरिताही इच्छुक स्पर्धकांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये रांगोळी स्पर्धा ही विभाग कार्यालय स्तरांवर घेण्यात येत असून, यामध्ये फ्री हॅन्ड, निसर्गचित्र किंवा देशभक्तीपर रांगोळी हे स्पर्धा विषय आहेत.
येत्या १६ डिसेंबरपर्यंत या स्पर्धेकरिता अर्ज करता
येतील. भाताचे विविध प्रकार या विषयावर पाककला स्पर्धा आणि सॅलेड सजावट स्पर्धा अशा दोन स्पर्धांकरिता दिनांक ३० डिसेंबरपर्यंत अर्ज भरावयाचे आहेत.
तसेच महिलांकरिता ‘स्मार्ट नवी मुंबई’ या विषयावर २८ डिसेंबरपर्यंत निबंध स्पर्धेकरिता निबंध सादर करावयाचे आहेत.
विनामूल्य स्टॉल..
१) स्पर्धांची सविस्तर माहिती, अर्ज, नियम, अटी व शर्ती महानगरपालिकेची सर्व आठ विभाग कार्यालये व उपायुक्त, समाज विकास विभाग, नवी मुंबई महानगरपालिका, बेलापूर भवन, पहिला मजला, से. ११, सीबीडी, बेलापूर येथे शासकीय सुट्या वगळून इतर दिवशी कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत.
२) स्पर्धेमध्ये केवळ नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या महिलाच सहभागी होऊ शकतात. महिला मंडळे, महिला बचत गट यांनी उत्पादित केलेल्या साहित्याची विक्री करण्यासाठी विनामूल्य स्टॉल उपलब्ध करून देण्यात येत असून, त्याकरिता ३० डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करावयाचे आहेत. या उप्रकमात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अपर्णा गवते व उपसभापती संगीता बोऱ्हाडे यांच्या वतीने करण्यात येत आहे.