मैदानात सभामंडपाला विरोध
By Admin | Updated: March 20, 2017 02:21 IST2017-03-20T02:21:34+5:302017-03-20T02:21:34+5:30
सीबीडीत एकाच सेक्टरमध्ये दोन सभामंडप उभारून पालिकेतर्फे होत असलेल्या आर्थिक उधळपट्टीला रहिवाशांनी विरोध केला

मैदानात सभामंडपाला विरोध
नवी मुंबई : सीबीडीत एकाच सेक्टरमध्ये दोन सभामंडप उभारून पालिकेतर्फे होत असलेल्या आर्थिक उधळपट्टीला रहिवाशांनी विरोध केला आहे. त्याठिकाणी यापूर्वीचे एक सभामंडप असतानाही अवघ्या चारशे मीटरवर दुसरे सभामंडप कशासाठी? असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे. शिवाय नव्याने होत असलेला सभामंडप हा खेळाच्या मैदानात असल्यामुळे स्थानिकांनी पालिकेच्या या कामाला विरोध दर्शवला आहे.
अनावश्यक खर्च टाळण्याच्या उद्देशाने मागील काही महिन्यात महापालिकेने अनेक कामांना स्थगिती दिलेली आहे. परंतु प्रशासनाचे हे धोरण दुटप्पी असल्याचे दर्शवणारा प्रकार सीबीडी येथे घडला आहे.
सीबीडी सेक्टर ८ येथील आर्टिस्ट व्हिलेजमध्ये पालिकेने नव्या सभामंडपाचे काम हाती घेतले आहे. मात्र या नव्या सभामंडपाच्या कामाला स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे. हा सभामंडप मैदानात उभारला जात आहे. यामुळे स्थानिक मुलांच्या क्रीडा स्पर्धांवर संक्रांत येवू शकते. रहिवाशांनी यासंबंधीचे पत्रही पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना दिले आहे. एकीकडे महापालिका अनावश्यक खर्च टाळण्याचा दिखावा करत कामांना स्थगिती देत आहे. दुसरीकडे मात्र अनावश्यक कामांच्या माध्यमातून जनतेच्या पैशाची उधळपट्टी होत आहे. त्यामुळे एकाच सेक्टरमध्ये पूर्वीचे सभामंडप असताना नव्या सभामंडपासाठी होणारा खर्च पालिकेने टाळावा. शिवाय तरुणांचे हक्काचे खेळाचे मैदान प्रशासनानेच हिरावून घेवू नये, अशीही त्यांची मागणी आहे.