घणसोली सेंट्रल पार्कच्या उद्घाटनाचा तिढा सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 01:03 AM2019-06-08T01:03:22+5:302019-06-08T01:03:37+5:30

पुनर्वसनाचा प्रश्न लागणार मार्गी : सिडको देणार २४०० चौरस मीटर भूखंड

The opening of the Ganshauli Central Park will be completed | घणसोली सेंट्रल पार्कच्या उद्घाटनाचा तिढा सुटणार

घणसोली सेंट्रल पार्कच्या उद्घाटनाचा तिढा सुटणार

googlenewsNext

योगेश पिंगळे

नवी मुंबई : घणसोली सेंट्रल पार्कमुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी २४०० चौरस मीटरचा भूखंड देण्यास सिडकोने सहमती दर्शविली आहे. यासाठी १० कोटी ५९ लाख रुपये १९ जुलैपर्यंत भरण्याचे पत्र महापालिकेला दिले आहे. पालिका हा विषय सर्वसाधारण सभेपुढे ठेवणार असून, सभेच्या मंजुरीनंतर पुढील प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेने प्रत्येक नोडमध्ये उद्याने निर्माण करण्याचे धोरण आखले आहे. सद्यस्थितीमध्ये २०० पेक्षा जास्त उद्याने व हरित क्षेत्र तयार केली आहेत. शहरातील वंडर्स पार्क, रॉक गार्डन, आर. आर. पाटील उद्यान, मँगो गार्डन व इतर सर्व भव्य उद्याने परिमंडळ एकमध्ये आहेत.

वाशी, नेरुळ व सीबीडी परिसराच्या तुलनेमध्ये घणसोली ते दिघा दरम्यान चांगली उद्याने नाहीत. हा असमतोल कमी करण्यासाठी महापालिकेने घणसोली सेक्टर ३ मध्ये जवळपास ३९ हजार हेक्टर जमिनीवर सेंट्रल पार्क उभारण्याचा निर्णय घेतला. २०१४ मध्ये उद्यानाचे काम सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी ओपन जीम, जलतरण तलाव, स्केटिंग रिंग, जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक, मिनी फुटबॉल कोर्स, आकर्षक मानवी पुतळे अशी उद्यानाची रचना करण्यात आली असून हे काम जवळपास पूर्ण झाले आहे. उद्यानाचे लोकार्पण लवकरात लवकर करावे अशी मागणी नागरिकांनी व विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनीही केली आहे.

सेंट्रल पार्क सावली गावच्या जागेवर उभारण्यात आले आहे. उद्यानासाठी भूखंड मोकळा करताना सिडको व महापालिकेने प्रकल्पग्रस्तांची काही जुनी घरेही पाडली आहेत. पुनर्वसनाचा प्रश्न सर्वप्रथम मार्गी लावण्यात यावा अशी मागणी प्रकल्पग्रस्त नागरिक व संस्थांनी केली आहे. जोपर्यंत पुनर्वसन होणार नाही तोपर्यंत उद्घाटन करून देणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी शासनस्तरावरही बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. आमदार संदीप नाईक, सामाजिक संस्था, महापालिका प्रशासन व इतरांनीही यासाठी वारंवार बैठकांचे आयोजन केले आहे.

शासन व सिडकोबरोबर झालेल्या बैठकांमध्ये तीन पर्याय निश्चित करण्यात आले होते. सिडकोने पुनर्वसनासाठी भूखंड उपलब्ध करून देण्याचे मान्य केले होते. त्यासाठीचे पैसे महापालिकेने सिडकोला जमा करणे अपेक्षित होते. सिडकोने २४०० चौरस मीटरचा भूखंड देण्याचे निश्चित केले आहे. यासाठी ३७,४०० रुपये प्रति चौरस फूट दराने ८ कोटी ९७ लाख ६० हजार रुपये भूखंडाची किंमत होत असून जीएसटीसह ही रक्कम १० कोटी ५९ लाख १६ हजार रुपये होत आहे. १९ जुलैपर्यंत रक्कम भरण्याचे पत्र सिडकोने ४ जूनला महापालिकेस दिले आहे.

प्रश्न सुटावा अशी अपेक्षा
सेंट्रल पार्क हे परिमंडळ दोनमधील सर्वात मोठे उद्यान असणार आहे. उद्यानाचे आकर्षक फोटो सोशल मीडियावरून व प्रसारमाध्यमातून व्हायरल होत असल्यामुळे नागरिकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे. उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे अनेक नागरिक लहान मुलांना घेऊन उद्यानाच्या प्रवेशद्वारापर्यंत येत आहेत. प्रवेशद्वारावर मुले खेळत असल्याचे चित्रही अनेकदा पाहावयास मिळत आहे. उद्यान लवकर खुले करावे, अशी मागणी नागरिकही करू लागले आहेत.

सर्वसाधारण सभेपुढे विषय येणार

  • भूखंडासाठी १० कोटी ५९ लाख रुपये भरण्यासाठीचे पत्र सिडकोने ४ जूनला पालिकेला दिले आहे. १९ जुलैपर्यंत हे पैसे भरणे आवश्यक आहे.
  • हा विषय सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवावा लागणार आहे. येणाºया सर्वसाधारण सभेपुढे हा विषय चर्चेला येण्याची शक्यता आहे.
  • महासभेने मंजुरी दिल्यानंतरच पुढील कार्यवाही सुरू होऊ न उद्घाटनाचा तिढाही सुटणार आहे.

Web Title: The opening of the Ganshauli Central Park will be completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.