नेताजींचे विचार अमलात आणले तरच देश प्रगतिपथावर धावेल
By नारायण जाधव | Updated: January 23, 2024 18:03 IST2024-01-23T18:03:02+5:302024-01-23T18:03:14+5:30
सुभाषचंद्र बोस यांची १२७ जयंती साजरी : मान्यवरांनी वाहिली आदरांजली

नेताजींचे विचार अमलात आणले तरच देश प्रगतिपथावर धावेल
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२७ वी जयंती वाशी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस स्मृती संस्थानतर्फे मंगळवारी मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम वाशी सेक्टर १७ येथील नेताजी सुभाषचंद्र बोस या चौकात सहायक पोलीस निरीक्षक (वाहतूक विभाग) योगेश गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून नेताजींना आदरांजली वाहण्यात आली. यानंतर संस्थेच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात उपस्थित सर्वच वक्त्यांनी नेताजींचे विचार अमलात आणले तर भारत खऱ्या अर्थाने प्रगतीच्या मार्गावर धावेल, असे विचार व्यक्त केले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना उत्तर भारतीय नेते, अभिनेते व माजी सैनिक एस. सी. मिश्रा म्हणाले की, आजचा युवक या आधुनिक युगात राष्ट्रासाठी समर्पित देशभक्तांना विसरत चालला असून, याचा विचार करण्याची गरज आहे.
देशभक्तीची भावना देशातील प्रत्येक नागरिकामध्ये असली पाहिजे, तरच देश प्रगती आणि विकासाच्या मार्गावर राहू शकेल, असे ते म्हणाले. कार्यक्रमात सरदार वल्लभभाई पटेल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि अपना दलाचे महाराष्ट्र प्रभारी महेंद्र वर्मा म्हणाले की, आज आपल्या देशातील शेतकऱ्यांनी इतकी प्रगती केली आहे की, ते शेतीशिवाय बॅटरी, बेअरिंग्ज आणि इतर अनेक सुटे भाग बनवत आहेत. आणि त्यांचा पुरवठा परदेशात करणे. यामुळे देशाच्या प्रगतीला आणि विकासाला हातभार लागेल.
सर्वधर्म विकास मंचचे अध्यक्ष मेघनाथ भगत, भाजपा नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर कोळपकर, जनकल्याण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश शर्मा, अपना दल नवी मुंबई अध्यक्ष आशिष गोस्वामी यांनीही या कार्यक्रमात मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून आलेले सहायक पोलीस निरीक्षक योगेश गायकवाड यांचे पत्रकार परमानंद सिंग यांनी स्वागत केले. दीक्षा बुक सेंटरचे संचालक दिनेश चव्हाण यांच्या हस्ते त्यांना भगवत गीता भेट देण्यात आली. या वेळी पत्रकार रामप्रीत राय, अजेंद्र आगरी, जनकल्याण समाज संस्थेचे नवी मुंबई अध्यक्ष मफतलाल चव्हाण, स्वर्णलता प्रधान, उन्नीकृष्णन, रमेश प्रजापती, आरटीआय कार्यकर्ते विजय नायर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार विनोद प्रधान यांनी केले तर आभार पत्रकार सुरेंद्र सरोज यांनी मानले.