मुंबईत कांद्याची आवक घटली, शेतकरी आंदोलनाचा परिणाम
By नामदेव मोरे | Updated: August 22, 2023 19:01 IST2023-08-22T19:01:10+5:302023-08-22T19:01:10+5:30
बाजार समितीमध्ये अक्त ५३२ टन आवक

मुंबईत कांद्याची आवक घटली, शेतकरी आंदोलनाचा परिणाम
नवी मुंबई : केंद्र शासनाने निर्यातशुल्क वाढविल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी माल विक्रीसाठी न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये आवक निम्यावर आली आहे. मंगळवारी फक्त ५३२ टन आवक झाली आहे.
सहा महिने बाजारभाव मिळत नसल्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नव्हता. ऑगस्टच्या सुरूवातीला बाजारभाव वाढू लागले असताना अचानक शासनाने निर्यात शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे बाजारभावावर परिणमा होऊ लागला असून राज्यभरातील शेतकरी व व्यापाऱ्यांनीही आंदोलनाची भुमीका घेतली आहे. गुरूवारी २४ ऑगस्टला मुंबई बाजार समितीमधील व्यवहारही बंद ठेवले जाणार आहेत.
सोमवारी बाजार समितीमध्ये १४०५ टन कांद्याची आवक झाली होती. मंगळवारी फक्त ५३२ टन आवक झाली आहे. निर्यातशुल्क वाढविल्यामुळे दर पडण्याची शक्यता असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कांदा बाजारात पाठविलेला नाही. सोमवारी नागपंचमीचा सण असल्यामुळे शेतकऱ्यांनी मुंबईकडे माल कमी पाठविला असण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. सोमवारी होलसेल मार्केटमध्ये कांदा ८ ते २२ रुपये प्रतीकिलो दराने विकला जात होता. मंगळवारी हेच दर ९ ते २४ रुपये झाले आहेत. बुधवारीही आवक कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.