बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला अटक
By सूर्यकांत वाघमारे | Updated: November 28, 2023 19:37 IST2023-11-28T19:36:50+5:302023-11-28T19:37:09+5:30
एक देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे आढळून आली.

बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला अटक
नवी मुंबई : अवैध पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एकाला न्हावाशेवा पोलिसांनी अटक केली आहे. तो वहाळ येथे राहणारा असून शस्त्र विक्रीसाठी तो आला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल व दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
न्हावाशेवा येथील स्मशानभूमी परिसरात एकजण अग्निशस्त्र घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून वरिष्ठ निरीक्षक संजीव धुमाळ यांनी उपनिरीक्षक नितीन सांगळे, हवालदार महेंद्रसिंग राजपूत, शिवाजी बसरे, संजय सकपाळ, विशाल हिंदोळा यांचे पथक केले होते. या पथकाने सोमवारी रात्री स्मशानभूमी परिसरात सापळा रचला होता. त्याठिकाणी एकजण आला असता त्याला ताब्यात घेऊन झडती घेण्यात आली.
यावेळी त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे आढळून आली. याबाबत चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. याप्रकरणी अजय सरपटा याच्यावर न्हावाशेवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. तो पनवेलच्या वहाळ येथे राहणारा असून शस्त्र विक्रीसाठी आला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.