कोपरीत जुन्या वाहनांचा बाजार सुरूच

By Admin | Updated: August 29, 2016 05:16 IST2016-08-29T05:16:28+5:302016-08-29T05:16:28+5:30

महापालिकेने पदपथांवरील अतिक्रमणांच्या विरोधात कंबर कसली आहे. परंतु या कारवाईला न जुमानता अनेक ठिकाणी पदपथांवर अतिक्रमण झाल्याचे पाहावयास मिळते.

The old vehicles market on the shore continues | कोपरीत जुन्या वाहनांचा बाजार सुरूच

कोपरीत जुन्या वाहनांचा बाजार सुरूच

नवी मुंबई : महापालिकेने पदपथांवरील अतिक्रमणांच्या विरोधात कंबर कसली आहे. परंतु या कारवाईला न जुमानता अनेक ठिकाणी पदपथांवर अतिक्रमण झाल्याचे पाहावयास मिळते. जुन्या वाहनांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी तर महापालिकेच्या या कारवाईला केराची टोपली दाखविल्याचे चित्र आहे. विशेषत: कोपरी येथील कार बाजार पुन्हा पाय रोवताना दिसत आहे.
पामबीच मार्गावरील कोपरी सिग्नलजवळील जुन्या वाहनांचा बाजार मागील काही दिवसांपासून पुन्हा तेजीत आला आहे. विक्रीसाठी आलेली वाहने सर्रासपणे पदपथांवर पार्क केली जातात. विशेष म्हणजे या कार बाजारविषयी वाहनधारक व स्थानिक रहिवाशांच्या नेहमीच्या तक्रारी आहेत. त्यानुसार येथील व्यावसायिकांवर यापूर्वी अनेकदा कारवाई करण्यात आली आहे. इतकेच नव्हे, तर पदपथांवरील वाहनांचे अतिक्रमण रोखण्यासाठी ठिकठिकाणी लोखंडी रॉड लावण्यात आले होते. मात्र हे लोखंडी रॉडही गायब झाल्याचे दिसून आले आहे.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अतिक्रमणांच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. त्यानुसार अनेक भागातील जुन्या विक्रीच्या विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. परंतु कारवाईचा ज्वर ओसरताच या विक्रेत्यांनी पुन्हा आपले व्यवसाय सुरू केल्याचे दिसून येते. कोपरीप्रमाणेच कोपरखैरणे व वाशी परिसरात ठिकठिकाणी मुख्य रस्त्याला समांतर असणाऱ्या रस्त्यांवरही जुन्या वाहनांचा विक्री बाजार थाटल्याचे पाहावयास मिळते. घणसोली स्थानकासमोरील रस्त्याच्या पदपथांवर दुचाकी विक्रीचे शोरूम आहे. या शोरूम्सधारकांनी विक्रीसाठी आलेल्या नवीन दुचाकी चक्क पदपथांवर उभ्या करून ठेवल्या आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना येथून ये-जा करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. या प्रकाराकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत आहे.(प्रतिनिधी)

Web Title: The old vehicles market on the shore continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.