पनवेल महापालिकेसाठी अधिकाऱ्यांची फिल्डिंग
By Admin | Updated: June 22, 2016 02:17 IST2016-06-22T02:17:00+5:302016-06-22T02:17:00+5:30
पनवेल महानगरपालिकेसाठी अध्यादेश जारी करण्यात आला असून अखेरच्या दिवसापर्यंत ३९५७ हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. याबाबत लवकरच सुनावणी अपेक्षित आहे

पनवेल महापालिकेसाठी अधिकाऱ्यांची फिल्डिंग
अरुणकुमार मेहत्रे, कळंबोली
पनवेल महानगरपालिकेसाठी अध्यादेश जारी करण्यात आला असून अखेरच्या दिवसापर्यंत ३९५७ हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. याबाबत लवकरच सुनावणी अपेक्षित आहे. त्यामुळे लवकरच पनवेल महापालिका अस्तित्वात येणार असून त्यासाठी अधिकाऱ्यांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.
पनवेल पालिकेतील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असल्या तरी ते खुर्चीला चिकटून आहेत. सत्ताधाऱ्यांच्या शिफारशी घेवून याच ठिकाणी राहण्याकरिता त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. केडरवाले सुध्दा पनवेल महापालिकेत काम करण्यासाठी उत्सुक आहेत. ही महानगरपालिका ‘ड’ वर्गाची असल्याने जवळपास साडेबाराशेच्या वर मनुष्यबळ लागणार आहे. त्यामध्ये आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, अभियंते, निरीक्षक, अधीक्षक, टंकलेखक, कारकुनांचा समावेश आहे. पनवेल नगरपालिकेत केडर त्याचबरोबर विना केडर अशा दोन प्रकारचे कर्मचारी आणि अधिकारी काम करतात. केडरवाल्यांची दुसरीकडे बदली होणे अपेक्षित असताना कित्येकजण अजूनही पनवेल पालिकेत काम करीत आहेत. पालिकेचे उपमुख्याधिकारी डॉ. भगवान खाडे यांची बदली दुसरीकडे झाली असताना ते पनवेलला राहण्यास इच्छुक आहेत. प्रशासकीय अधिकारी गणेश साळवे यांच्यासह इतर केडरवाले कित्येक वर्षांपासून एकाच जागेवर आहेत. पालिकेच्या अतिरिक्त मुख्याधिकारी चारुशीला पंडित यांची सुध्दा मागील आठवड्यात ठाणे महानगरपालिकेत बदली झाली आहे. परंतु ही बदली थांबविण्याकरिता प्रयत्न सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. सुरेंद्र उईके नावाच्या अनुभवी अभियंत्याची बदली रत्नागिरी नगरपालिकेत करण्यात आली. या अधिकाऱ्यांना थांबविण्यासाठी वरिष्ठ पातळीवर शिफारशी करण्यात येत आहेत.