आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी केली साफसफाई

By Admin | Updated: October 1, 2015 02:03 IST2015-10-01T02:03:17+5:302015-10-01T02:03:17+5:30

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत नागरिकांना स्वच्छतेचे आवाहन करण्यासाठी पालिका आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी स्वत: नेरूळ रेल्वे स्टेशन परिसराची साफसफाई केली.

Officers and officials cleared cleanliness | आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी केली साफसफाई

आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी केली साफसफाई

नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत नागरिकांना स्वच्छतेचे आवाहन करण्यासाठी पालिका आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी स्वत: नेरूळ रेल्वे स्टेशन परिसराची साफसफाई केली. यावेळी आरोग्य रक्षणासाठी मास्क, हातमोजे यांचा वापर केला. परंतु दुसरीकडे वर्षानुवर्षे कचरा वेचण्याचे व सफाईचे काम करणाऱ्या कामगारांना मात्र या सुविधा अद्याप मिळत नाहीत.
नवी मुंबई महानगरपालिकेला स्वच्छतेचे राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाले आहेत. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेमध्येही शहराचा समावेश झाला असून देशात तिसरे मानांकन मिळाले आहे. या अभियानामध्ये प्रथम क्रमांक मिळावा यासाठी महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच भाग म्हणून महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी नेरूळ रेल्वे स्टेशन परिसरात साफसफाई मोहीम राबविली. पालिका प्रशासनाच्या या उपक्रमाचे सर्वच नागरिकांनी स्वागत केले. स्वत: मोहिमेत भाग घेवून अधिकाऱ्यांनी शहरवासीयांना स्वच्छ भारत अभियानामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी महापौर सुधाकर सोनावणे यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनी वैयक्तिक व शहर स्वच्छतेची शपथ घेतली.
एक दिवसाच्या स्वच्छता मोहिमेसाठी अधिकाऱ्यांनी पांढरे शुभ्र टी शर्ट, हातमोजे, तोंडावर मास्क, पायात बुट सुस्थितीमध्ये असलेले झाडू घेवून परिसर साफ केला. परंतु दुसरीकडे रोज साफसफाईचे व कचरा उचलण्याचे काम करणारे कर्मचारी मात्र पुरेशा सुविधा नसतानाही हे काम करत आहेत. शहरातील कंत्राटी कामगारांच्या तोंडाला मास्क, हातात मोजे व पायात बुट कधीच दिसत नाहीत. कामगारांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असून अनेकांना श्वसनाचे व इतर आजार झाले आहेत. शहर स्मार्ट बनविण्यासाठी या कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारण्यावर लक्ष देण्याची गरज असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत. आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आवश्यक सुविधा कधी मिळणार असा प्रश्न कामगारांनी उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Officers and officials cleared cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.