शहरातील ५७९ इमारतींना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 23:28 IST2019-07-11T23:28:28+5:302019-07-11T23:28:32+5:30
अग्निशमन नियमांचे उल्लंघन : पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा

शहरातील ५७९ इमारतींना नोटीस
नवी मुंबई : शहरातील अग्निशमन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इमारतींवर कडक कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. पालिकेने आतापर्यंत तब्बल ५७९ इमारतींना नोटीस पाठविली आहे. यानंतरही नियमांचे पालन न केल्यास संबंधित इमारतींचा वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्येही इमारतींना आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. औद्योगिक वसाहतीमधील अनेक कंपन्या जळून खाक झाल्या आहेत. शहरातील बैठ्या चाळींसह बहुमजली इमारतींना आग लागून जीवित व वित्तहानी झाल्याच्या घटना वाढल्या आहेत. भविष्यातही या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत आग लागलेल्या ठिकाणाची पाहणी केल्यानंतर अग्निशमन नियमांचे पालन केले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव सुरक्षा उपाययोजना अधिनियम २००६ व नियम २००९ अन्वये प्रत्येक इमारतीमधील आग प्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित असल्याबाबत शासन मान्यताप्राप्त लायसन्स अभिकरणामार्फत विहित नमुन्यातील प्रमाणपत्र अग्निशमन विभागाकडे सादर करणे आवश्यक आहे.
महापालिकेनेही अग्निशमन नियमांचे तंतोतंत पालन केले जावे, असे आवाहन वेळोवेळी केले आहे; परंतु या सूचनांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. नियमांचे उल्लंघन करणाºया तब्बल ५७९ इमारतींना नोटीस पाठविण्यात आली आहे. यामध्ये ५०० निवासी इमारतींचा समावेश आहे. १७ शाळा व महाविद्यालयांसह १८ रुग्णालयांनाही नोटीस पाठविली आहे. दोन मॉलमध्येही अग्निशमन यंत्रणा कार्यरत नसल्याने त्यांना नोटीस पाठविली असून एक महिन्यात ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नोटीस पाठविलेल्या इमारतधारकांनी एक महिन्यात आग विझविण्याची यंत्रणा कार्यान्वित केली नाही तर त्यांच्यावर कायद्यातील तरतुदीप्रमाणे कडक कारवाई केली जाणार आहे. संबंधितांचा वीजपुरवठा व पाणीपुरवठा थांबविण्यात येणार आहे. प्रत्येक सदनिकाधारकांनी तेथे राहणाºया नागरिकांच्या सुरक्षेसाठी अग्निशमन नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. महापालिका कार्यक्षेत्रामध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पाचही मार्केटमध्ये नियमांचे उल्लंघन केले जात आहे. तेथे आग लागल्याच्या अनेक घटना घडल्यानंतरही प्रशासन व व्यापारी यांनी आग विझविण्यासाठी काहीही ठोस तरतूद केलेली नाही. अनेक रुग्णालयांमध्येही अशीच स्थिती आहे. आग लागल्यास रुग्णांना इमारतीच्या बाहेर काढणे अशक्य होणार आहे.
शाळा-महाविद्यालयांमध्ये आग लागल्यास आगीमुळे व पळताना चेंगरून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता आहे. खासगी क्लासेससह नर्सरीचालकांकडूनही पुरेशी काळजी घेतली जात
नसून त्यांनाही पालिकेने आवाहन केले आहे.