सामान्यांचे सोडा, बँक मॅनेजरलाच घातला १० लाखाचा गंडा; १८० रुपयांच्या नफ्यावरून लागला गळाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 17:54 IST2023-06-08T17:54:06+5:302023-06-08T17:54:12+5:30
सीबीडी येथे राहणाऱ्या सुजित कुमार यांच्यासोबत हा प्रकार घडला असून ते एका बँकेचे मॅनेजर आहेत.

सामान्यांचे सोडा, बँक मॅनेजरलाच घातला १० लाखाचा गंडा; १८० रुपयांच्या नफ्यावरून लागला गळाला
लोकमत न्यूज नेटवर्क,
नवी मुंबई : ऑनलाईन टास्क पूर्ण करून पैसे कमवण्याच्या प्रयत्नात बँक मॅनेजरनेच दहा लाख रुपये गमावले आहेत. याप्रकरणी सीबीडी पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेलिग्रामवर आलेल्या लिंकला भुलून त्यांना प्रतिसाद दिल्याने ऑनलाईन फसवणूक झाली आहे.
सीबीडी येथे राहणाऱ्या सुजित कुमार यांच्यासोबत हा प्रकार घडला असून ते एका बँकेचे मॅनेजर आहेत. त्यांना लिंकला लाईक करून व टास्क पूर्ण करून पैसे कमवण्याचा मॅसेज टेलिग्रामवर आला होता. या मॅसेजला त्यांनी प्रतिसाद दिला असता त्यांना एका ग्रुपमध्ये घेण्यात आले. यानंतर त्यांनी दोन लिंकला लाईक केल्याने त्यांना १८० रुपयांचा नफा देण्यात आला. यामुळे आपला फायदा होत असल्याचे कुमार यांना वाटल्याने अज्ञात व्यक्तींच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी संबंधितांच्या खात्यावर टप्प्या टप्प्याने १० लाख रुपये पाठवले.
परंतु यानंतर त्यांना ना कोणता मोबदला मिळाला, ना भरलेली रक्कम परत मिळाली. यावरून आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे. याप्रकरणी सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेवरून सर्वसामान्यांप्रमाणेच बँक अधिकारी देखील सायबर गुन्हेगारीच्या पद्धतीबद्दल अज्ञानी असल्याचे दिसून येत आहे.