No plots were found in the city for cattle breeding | गोवंश संवर्धनासाठी शहरात भूखंड मिळेना

गोवंश संवर्धनासाठी शहरात भूखंड मिळेना

नामदेव मोरे 

नवी मुंबई : पनवेल परिसरात भटक्या प्राण्यांचा विशेषत: देशी गार्इंचा सांभाळ करण्यासाठी एकही भूखंड सिडकोने उपलब्ध करून दिलेला नाही. यामुळे रस्त्यावर आढळणाऱ्या जखमी व आजारी गार्इंवर उपचार करून त्यांचा सांभाळ करताना सामाजिक कार्यकर्त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सिडकोकडे पाठपुरावा केल्यानंतर फक्त आश्वासनावर बोळवण केली जात असून, प्रत्यक्ष भूखंड उपलब्ध करून देण्यास दिरंगाई केली जात आहे.

सुनियोजित शहर म्हणून नवी मुंबई व पनवेलची ओळख आहे. या परिसराचे नियोजन करताना पायाभूत सुविधांसह सामाजिक सुविधांचाही विचार करण्यात आला आहे. परिसरातील समस्या लक्षात घेऊन त्यासाठी जागा आरक्षित करणे आवश्यक आहे; परंतु हे नियोजन करताना भटक्या प्राण्यांसाठी विशेषत: देशी गार्इंचा सांभाळ करण्यासाठी काहीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. या परिसरामध्ये भटक्या गाई मोठ्या संख्येने आढळून येतात. २००९ ते २०१४ या कालावधीमध्ये खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल परिसरात तब्बल १४८५ गाई पकडून विविध गोशाळांमध्ये पाठविण्यात आल्याची नोंद आहे. मुंबईच्या वेशीवर हा परिसर असल्यामुळे राज्याच्या विविध भागांतून विनापरवाना विक्रीसाठी आलेल्या गार्इंची या परिसरात सुटका केली जाते. अनेक वेळा जखमी गाईही आढळून येत असून त्यांचा सांभाळ सामाजिक कार्यकर्ते १५ ते २० वर्षांपासून करत असून यामध्ये गोळवलकर गुरुजी चॅरिटेबल ट्रस्टचाही समावेश आहे. सामाजिक कार्यकर्ते शैलेश खोतकर ट्रस्टच्या वतीने श्री नंदिनी गोशाळा चालविली जाते. संस्थेचे काम पाहून सप्टेंबर २०१४ मध्ये खारघर पोलीस स्टेशनने संस्थेला अधिकृतपणे पत्र देऊन परिसरातील भटक्या गाई तुम्ही ताब्यात घेऊन त्यांचा सांभाळ करावा. ही जनावरे घेऊन जाण्यासाठी वेळ पडल्यास पोलीस बंदोबस्त दिला जाईल असे कळविले होते.

खारघर सेक्टर १ मध्ये खाडीकिनारी शेड उभारून या परिसरातील बेवारस गार्इंचा तेथे सांभाळ केला जात आहे. या निवारा केंद्रामध्ये सद्यस्थितीमध्ये ८५ गाई आहेत. पनवेल परिसरात कुठेही गाई आढळून आल्या की पोलीस, सामाजिक कार्यकर्ते संस्थेशी संपर्क साधून मदत करण्याचे आवाहन केले जाते. जखमी गार्इंवर उपचार केले जात आहेत. गंभीर जखमा झाल्या असल्यास मुंबईमधील प्राणी रुग्णालयात नेऊन तेथे उपचार केले जात आहेत. अनेक गैरसोयींना सामोरे जाऊन सामाजिक कार्यकर्त्यांनी हे काम सुरू ठेवले आहे. या कामासाठी भूखंड उपलब्ध व्हावा यासाठी सिडकोकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. २०१३ मध्ये सिडकोचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. बेलापूरमधील निसर्ग उद्यानाच्या परिसरात स्पेशल प्रोजेक्ट म्हणून मंजुरी देण्यासाठी कार्यवाही सुरू केली होती; परंतु त्यांच्या बदलीनंतर ही प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू आहे.

पनवेल परिसरामधील बेवारस गार्इंचा सांभाळ अनेक वर्षांपासून करत आहोत. गार्इंवर उपचार करणे व त्या जिवंत असेपर्यंत सांभाळ करत आहोत. सद्यस्थितीमध्ये केंद्रात ८५ गाई आहेत. या कामासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी सिडकोकडे पाठपुरावा सुरू आहे. लवकरात लवकर यासाठी जागा उपलब्ध झाल्यास या कार्यातील गैरसोयी दूर होऊ शकतील. - शैलेश खोतकर, अध्यक्ष, गोळवलकर गुरुजी चॅरिटेबल ट्रस्ट

शासनाकडेही पाठपुरावा
पनवेल परिसरामध्ये अनेक वर्षांपासून बेवारस गाई सांभाळण्याचे काम सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. या कामाचे स्वरूप, बेवारस गार्इंच्या समस्या व या प्रश्नाविषयी सविस्तर अहवाल तयार करण्यात आला आहे. या परिसरात या पूर्वी झालेल्या गार्इंची चोरी व इतर सर्व गोष्टींचा तपशिलासह शासनाकडेही पाठपुरावा सुरू केला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी बेलापूर टेकडीच्या पायथ्याला प्रस्तावित निसर्ग उद्यान किंवा इतर ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

पोलिसांनीही दिले होते पत्र
पनवेल परिसरामध्ये गार्इंचा सांभाळ करण्यासाठी स्वतंत्र केंद्र असणे आवश्यक आहे. यासाठी यापूर्वी खारघर पोलिसांनी सिडकोला पत्र दिले होते. या परिसरात सापडणाºया गाई गोळवलकर गरुजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून चालविल्या जाणाºया नंदिनी गोशाळेत सांभाळण्यासाठी पाठविल्या जात आहेत. या कार्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचेही त्यांनी सुचविले होते.

प्रश्न सोडविण्यास दिरंगाई
बेवारस गार्इंचा सांभाळ करण्यासाठी व जखमी गार्इंवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र केंद्र असणे आवश्यक आहे. यासाठी सिडकोकडे पाठपुरावा सुरू आहे. यापूर्वीचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी स्पेशल प्रोजेक्ट म्हणून जागा उपलब्ध करून देण्याचे मान्य करून कार्यवाही सुरू केली होती; परंतु त्यानंतर या विषयीची कार्यवाही धिम्या गतीने सुरू आहे. लवकर हा प्रश्न सोडविण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.

Web Title: No plots were found in the city for cattle breeding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.