चारा नाही, पाणी नाही, दापचरी सुरु होणार कसा?
By Admin | Updated: August 19, 2015 23:32 IST2015-08-19T23:32:09+5:302015-08-19T23:32:09+5:30
पुरेसा पाऊस नाही, सिंचनासाठीचे वॉटरपंप जळालेले ते दुरुस्त करण्यासाठी निधीचा अभाव अशा कात्रीत दापचरी येथील शेतकरी अडकला असून त्याचा परिणाम दुग्ध उत्पादनावर झाला आहे

चारा नाही, पाणी नाही, दापचरी सुरु होणार कसा?
तलासरी : पुरेसा पाऊस नाही, सिंचनासाठीचे वॉटरपंप जळालेले ते दुरुस्त करण्यासाठी निधीचा अभाव अशा कात्रीत दापचरी येथील शेतकरी अडकला असून त्याचा परिणाम दुग्ध उत्पादनावर झाला आहे. येथील शासकीय प्रकल्प भ्रष्टाचारामुळे बंद पडलेला आहे. दुग्धव्यवसाय वाचविण्यासाठी येथील शेतकऱ्यांना कसरत करवी लागते आहे. जनावरांनासाठी लागणारा चारा पिकविण्यासाठी सिंचन सुविधा नाही, पाऊस पडत नाही त्यामुळे व्यवसाय करायचा कसा, हा प्रश्न आहे.
एका बाजूला दूध उत्पादन करा, चारा पिकवा, याचा तगादा तर दुसऱ्या बाजूला चारा उत्पादनासाठी व जनावरांसाठी पाण्याचा पुरवठाच नाही, अशी परिस्थिती आहे. शेतकऱ्यांना (कृषी क्षेत्रधारकांना) प्रवाह व उपजल सिंचनाद्वारे शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. सध्या उपजल सिंचन क्र. ४, ५ व १५८ वरील शेतीचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. तसेच उपजल सिंचन क्र. ५ वरील चारी क्र. २८ वरून होणारा पाणीपुरवठा गेल्या २० वर्षांपासून बंद आहे. तर उपजलसा सिंचन क्र. ४ धामणीनाला येथील विद्युत मोटारी जळाल्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून कृषी सिंचन बंद आहे.
उपजलसा क्र. ५ वर तीन मोटारी (विद्युत) असून त्यापैकी एकच मोटार गेल्या १५ वर्षांपासून सुरू आहे. परंतु, तीही विद्युत मोटार जून २०१५ पासून बंद पडल्याने दापचरेतील कृषी क्षेत्राचा पाणीपुरवठा पूर्णत: बंद पडला आहे. त्यामुळे पावसाळा असूनसुद्धा शेतकऱ्यांना पाण्याची प्रतीक्षा
आहे.
जून महिन्यापासून बंद पडलेल्या मोटारीची बेअरिंग जळाली आहे. परंतु, दापचरी दुग्ध प्रकल्पाच्या विद्युत विभागाकडे बेअरिंग टाकून मोटार दुरुस्त करण्यासाठी निधीच उपलब्ध नाही.
प्रकल्प बंद पडल्यापासून दापचरी प्रकल्पाच्या विद्युत विभागाला फारसे कामही नाही, तरीही अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या वेतनावर लाखो रुपये खर्च होतात. परंतु, बेअरिंगसाठी नाममात्र रक्कम खर्च करावयास असू नये, यासारखे दुर्दैव तरी कोणते. (वार्ताहर)