अभ्यास न केल्याने शिक्षिकेची नऊ वर्षांच्या मुलीला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 06:32 IST2019-07-10T06:32:34+5:302019-07-10T06:32:34+5:30
नेरुळची घटना ; संपूर्ण शरीरावर जखमा, गुन्हा दाखल

अभ्यास न केल्याने शिक्षिकेची नऊ वर्षांच्या मुलीला मारहाण
नवी मुंबई : गृहपाठ न केल्याने चौथीत शिकणाऱ्या मुलीला खासगी शिकवणीच्या शिक्षिकेने सोमवारी अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, कारवाईसाठी पोलीस चालढकल करत असल्याचा मुलीच्या वडिलांचा आरोप आहे.
साक्षी शिनलकर (९) असे मारहाण झालेल्या मुलीचे नाव आहे. ती नेरुळ सेक्टर १० येथे राहत असून सेक्टर ८ येथे घरगुती क्लासला जाते. सोमवारी तिने गृहपाठ न केल्याच्या कारणावरून क्लासच्या शिक्षिका गोम्स यांनी तिला अमानुष मारहाण केली. यामध्ये तिच्या संपूर्ण शरीरावर वळ, काळे-निळे डाग पडले आहेत.
हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तिच्या पालकांनी नेरुळ पोलिसांकडे तक्रार केली. परंतु गुन्हा दाखल होऊनदेखील शिक्षिकेला अटक करण्यात पोलीस चालढकल करत असल्याचा आरोप साक्षीचे वडील दत्तू शिनलकर यांनी केला आहे. चौकशीच्या बहाण्याने आपल्यालाच सुमारे तीन तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवल्याचाही संताप त्यांनी व्यक्त केला आहे.