नेरूळचा फ्लेमिंगो तलाव प्रदूषित; जलप्रवाह बंदीमुळे अधिवास धोक्यात, पर्यावरणप्रेमींचा निर्वाणीचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 11:02 IST2026-04-12T11:02:21+5:302026-04-12T11:02:46+5:30
Navi Mumbai News: सांडपाण्याचा वाढत्या प्रदूषणामुळे नेरूळ येथील फ्लेमिंगो तलावातील पक्ष्यांच्या अधिवासावर संकट ओढवले आहे, असे निरीक्षण पर्यावरणप्रेमींनी नोंदविले आहे. त्यामुळे ठाणे खाडीतील या रामसर दर्जाच्या क्षेत्राशी संबंधित असलेल्या या पाणथळीच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त होत आहे.

नेरूळचा फ्लेमिंगो तलाव प्रदूषित; जलप्रवाह बंदीमुळे अधिवास धोक्यात, पर्यावरणप्रेमींचा निर्वाणीचा इशारा
नवी मुंबई - सांडपाण्याचा वाढत्या प्रदूषणामुळे नेरूळ येथील फ्लेमिंगो तलावातील पक्ष्यांच्या अधिवासावर संकट ओढवले आहे, असे निरीक्षण पर्यावरणप्रेमींनी नोंदविले आहे. त्यामुळे ठाणे खाडीतील या रामसर दर्जाच्या क्षेत्राशी संबंधित असलेल्या या पाणथळीच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त होत आहे.
तलावाला खाडीशी जोडणारी दक्षिणेकडील मुख्य जलप्रवाह बंद झाल्याने पाण्याचा नैसर्गिक प्रवाह थांबला आहे. तो तत्काळ सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तलावातील पाणी सेंद्रिय कचऱ्यामुळे विषारी होत आहे. त्यामुळे जलपक्ष्यांना आवश्यक असलेले सूक्ष्मजीव व लहान मासे नष्ट होत आहेत. परिणामी, अन्नसाखळी विस्कळीत होऊन तलाव जलपक्ष्यांसाठी अयोग्य ठरत आहे, असे नॅटकनेक्ट फाउंडशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले.
ही तर गंभीर पर्यावरणीय धोक्याची घंटा
यंदाच्या हंगामात फ्लेमिंगो या तलावात दिसले नाहीत, ही गंभीर पर्यावरणीय धोक्याची घंटा आहे. वनविभागाच्या स्वच्छता मोहिमेदरम्यान तलावाच्या पृष्ठभागावर दाट शेवाळ पसरलेल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तलावात चिखल आणि सांडपाणी साचले आहे. अशा स्थितीत फ्लेमिंगोंना विसावा घेणे किंवा अन्न शोधणे शक्य नसल्याचे बी. एन. कुमार यांनी स्पष्ट केले आहे.
उपाययोजना कोणत्या हव्यात?
ओहोटीच्या वेळी दूषित पाणी पूर्णपणे बाहेर न गेल्याने शेवाळ वाढ झपाट्याने होत आहे. त्यामुळे जलपक्ष्यांसाठी आवश्यक अन्नस्रोत नष्ट होत आहेत. या पार्श्वभूमीवर पर्यावरणप्रेमींनी खाडीशी जोडणारी जलवाहिनी तातडीने पूर्ववत करणे, सांडपाण्याचे स्रोत शोधून त्यावर नियंत्रण ठेवणे आणि तलावाची शास्त्रीय पद्धतीने स्वच्छता करणे आवश्यक असल्याची मागणी त्यांनी संबधित प्रशासनाकडे केली आहे.
पाण्यावर दिसणारा फेस व तेलकट थर हे शहरी किंवा औद्योगिक सांडपाण्याचे संकेत असल्याचे नमूद केले आहे. तलावाशी जोडलेल्या नाल्यांमधून दूषित पाणी मोठ्या प्रमाणात मिसळत असल्याची शक्यता व्यक्त आहे.
- ज्योती नाडकर्णी, पर्यावरणप्रेमी