नेरूळ-उरण मार्गाचा जुलैचा मुहूर्त हुकणार?

By Admin | Updated: March 20, 2017 02:20 IST2017-03-20T02:20:24+5:302017-03-20T02:20:24+5:30

सिडकोचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नेरूळ-उरण रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे बहुतांशी काम पूर्ण झाले आहे. जुलै २0१७ पासून

Nerul-Uran route will fall in July? | नेरूळ-उरण मार्गाचा जुलैचा मुहूर्त हुकणार?

नेरूळ-उरण मार्गाचा जुलैचा मुहूर्त हुकणार?

नवी मुंबई : सिडकोचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नेरूळ-उरण रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे बहुतांशी काम पूर्ण झाले आहे. जुलै २0१७ पासून पहिल्या टप्प्यातील खारकोपरपर्यंत प्रत्यक्ष लोकल सेवा सुरू करण्याचा सिडकोचा मानस आहे. असे असले तरी अंतिम टप्प्यातील उर्वरित कामे अत्यंत धीम्या गतीने सुरू आहेत. जुलै २0१७ चा मुहूर्त हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मानखुर्द-पनवेल व ठाणे-पनवेल या दोन रेल्वे प्रकल्पामुळे नवी मुंबईच्या विकासाला मोठ्या प्रमाणात हातभार लागला आहे. या प्रकल्पात सिडकोचे मोठे योगदान राहिले आहे. या दोन मोठ्या प्रकल्पापाठोपाठ सिडकोने जुलै १९९७ मध्ये नेरूळ-उरण या २७ किमी लांबीच्या रेल्वे मार्गाचा प्रस्ताव तयार केला होता. परंतु विविध कारणांमुळे हा प्रकल्प कागदावरच सीमित राहिला होता. असे असले तरी सिडकोच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश येवून अखेर जून २0१२ पासून या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. सिडको व रेल्वे यांच्या संयुक्त सहकार्याने उभारण्यात येत असलेल्या या मार्गावर १0 स्थानके आहेत, तर या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च १७८२ कोटी रुपये इतका आहे. हा प्रस्ताव तयार केला तेव्हा या प्रकल्पाचा खर्च केवळ १४१२ कोटी रुपये इतका निर्धारित करण्यात आला होता. या संपूर्ण मार्गावर चार उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. त्यापैकी उलवे खाडीवरील सर्वात मोठ्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच या मार्गावरील सहाव्या क्रमांकाच्या खारकोपर स्थानकाचे कामही जवळजवळ पूर्ण होत आले आहे.
शेवटच्या टप्प्यातील काही कामे प्रगतिपथावर आहेत. परंतु विविध कारणांमुळे ही कामे अत्यंत संथ गतीने सुरू आहेत. त्यामुळे पुढील तीन महिन्यांत ती पूर्ण होण्याची शक्यता धूसर आहे. या पार्श्वभूमीवर नेरूळ-उरण मार्गाच्या पहिल्या टप्प्याचा लोकल प्रवास आणखी काही महिने रखडण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.
खारकोपरनंतरच्या मार्गाचे काम भूसंपादन, खारफुटी आणि इतर कारणांमुळे काही प्रमाणात रखडले आहे. असे असले तरी या अडथळ्यावर मात करण्यासाठी सिडको व रेल्वे विभागाकडून प्रयास सुरू आहेत. यातील बहुतांशी अडथळे दूर झाले आहेत. उर्वरित प्रश्नही लवकरच मार्गी लागतील, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर नेरूळ-उरण रेल्वे मार्गाचे काम जलदगतीने होणे गरजेचे असल्याने पुढील एक दीड वर्षात या मार्गाचे उर्वरित कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे.

Web Title: Nerul-Uran route will fall in July?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.