मिनी सिशोरसह वाशीतील उद्यानांच्या देखभालीकडे दुर्लक्ष; संरक्षण जाळीही तोडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 23:18 IST2020-10-31T23:18:28+5:302020-10-31T23:18:52+5:30
Navi Mumbai : नवी मुंबईमधील सर्वाधिक गर्दी असणाऱ्या उद्यानांमध्ये मिनी सिशोर, मीनाताई ठाकरे उद्यान, सेंट मेरी उद्यान व मुन्ना, मुन्नी पार्कचा समावेश होतो.

मिनी सिशोरसह वाशीतील उद्यानांच्या देखभालीकडे दुर्लक्ष; संरक्षण जाळीही तोडली
नवी मुंबई : शहरातील सर्वाधिक गर्दी असणाऱ्या मिनी सिशोर व वाशी सेक्टर १० मधील उद्यानांची दुरवस्था होऊ लागली आहे. गवत वाढले आहे, कचरा व्यवस्थित उचलला जात नाही. प्रसाधनगृहांची स्वच्छता केली जात नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
नवी मुंबईमधील सर्वाधिक गर्दी असणाऱ्या उद्यानांमध्ये मिनी सिशोर, मीनाताई ठाकरे उद्यान, सेंट मेरी उद्यान व मुन्ना, मुन्नी पार्कचा समावेश होतो. लाॅकडाऊनमुळे मार्चपासून उद्याने बंद करण्यात आली होती. या दरम्यान, ठेकेदाराने उद्यानांची योग्य देखभाल केली नाही. मिनी सिशोर परिसरात गवत वाढले आहे. काही विद्युत खांब पडले आहेत. काही खांबांची तोडफोड झाली आहे. अनेक ठिकाणी दारूच्या बाटल्या व इतर कचरा आहे. प्रसाधनगृहांची स्वच्छता ठेवली जात नसल्याने दुर्गंधी पसरू लागली आहे.
सिशोरच्या समोरील उद्यानांचीही व्यवस्थित देखभाल होत नाही. पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने दलदल तयार झाली आहे. चिखल तयार झाला आहे. काही खेळणी तुटली आहेत. संरक्षण भिंतीवरील जाळी तोडली आहे.
मिनी ट्रेन दिवाळीतही बंदच राहणार
उद्यानांमध्ये लहान मुलांसाठी मिनी ट्रेनची व्यवस्था आहे, परंतु लाॅकडाऊनमुळे सात महिने ट्रेन बंदच आहे. अद्याप कोरोनाचे संकट कायम असल्यामुळे या दिवाळीतही मुलांना मिनी ट्रेनचा आनंद घेता येणार नाही.