राष्ट्रवादीच्या बंडखोरांचा गट बेकायदेशीर
By Admin | Updated: December 30, 2014 22:34 IST2014-12-30T22:34:18+5:302014-12-30T22:34:18+5:30
जव्हार नगर परिषदेतील राजकीय घडामोडीने रोज नवीन वळण घेत असल्याने राष्ट्रवादीच्या कार्याकर्त्यात संभ्रमाचे वातावरण आहे.

राष्ट्रवादीच्या बंडखोरांचा गट बेकायदेशीर
जव्हार : जव्हार नगर परिषदेतील राजकीय घडामोडीने रोज नवीन वळण घेत असल्याने राष्ट्रवादीच्या कार्याकर्त्यात संभ्रमाचे वातावरण आहे. ते दूर करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पत्रकार परीषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली. या राजकीय नाट्याबाबत व गट बाजी बाबत बोलतांना संदिप वैद्य यांनी, नगर परिषदेत राष्ट्रवादीचे एकुण १४ नगरसेवक निवडून आले होते, पैकी १० नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन अविश्वास ठराव व वेगळा गट स्थापने करीता पत्र दिले होते, जिल्हाधिकाऱ्यांनी त्या गटाला मान्यता दिली व दि. २९ रोजी अविश्वास ठरावाची सभा घेण्याचे आदेश दिले, परंतु आमचे गटाच्या मान्यतेलाच आव्हान असून नविन बदललेल्या कायद्यानुसार जर एखाद्या पक्षातील लोकप्रतिनिधींना वेगळे व्हावयाचे असेल तर त्यांना एखाद्या राजकीय पक्षातच विलीन व्हावे लागते, त्या अगोदर त्या पक्षाच्या गटनेत्याला पक्षाचा राजीनामा द्यावयाचा असतो, त्यामुळे पालघर जिल्हाधिकारी यांनी १० नगरसेवकांच्या जव्हार विकास आघाडी या गटाची मान्यता देणे, ही बाबच नियमबाह्यअसल्यामुळे गटनेते म्हणून संदिप वैद्य, रियाज मनियार, मनिषा वाणी व संजय वांगड आम्ही चारीही जणांनी जिल्हाधिाकऱ्यांच्या निर्णया विरूध्द उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून न्यायालयाने ती सकृतदर्शी मान्य केली व नियमित न्यायालयात पुन्हा याचिका दाखल करण्याची दि. ६ जानेवारी पर्यत मुदत दिली आहे. आम्ही याचिकेत महाराष्ट्र शासनाला प्रतिवादी केल्यामुळे पुढील सुनवणी दरम्यान ते आपले म्हणणे न्यायालयात मांडतील, आमचा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. तसेच प्रशासनाकडून न्यायालयाच्या आदेशाचे व नियमांचे योग्य पालन होईल असे मत रियाज मनियार यांनी व्यक्त केले.
मंगळवारी नगर परिषदेची झालेली स्थायी व विषय समिती सभापती व सदस्यांची निवडणूक ही आमच्या दृष्टीने बेकायदेशीर असल्यामुळे आम्ही निवडणूक प्रक्रियेस उपस्थित नव्हतो. तसेच नगर परिषदेचा उपनगराध्यक्ष हाच नियोजन विकास, कर, वसूली, शिक्षण व सांस्कृतिक समितीचा पदसिध्द सभापती असतांना उपनगराध्यक्षांनविना झालेली ही निवड कोणत्या नियमात बसते? जव्हार नगर परिषदेबाबतचा वाद न्याय प्रविष्ठ असतांना ही निवडणूक जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्या नियमांच्या आधारे घेतली याबाबत आम्ही स्पष्टीकरण मागणार आहोत, असे संदिप वैद्य यांनी सांगितले.
मनिषा वाणी यांनी येणाऱ्या सहा महिंन्यात नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याने विरोधी पक्षाने मोठ्याप्रमाणात बोली लावून आमच्या पक्षात फोडाफोडीचे राजकारण केले. जनतेने आम्हा सर्व १४ नगरसेवकांना राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून दिले. त्यामुळे या बंडखोर नगरसेवकांनी हिंमत असेल तर, पहिले स्वत:च्या पदाचा राजीनामा द्यावा व पुन्हा निवडून यावे असे आव्हान आम्ही करीत आहोत. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष काळात आम्ही शासनाकडे पाठपुरवा करून आजपर्यत इतिहासात प्रथमच १२ कोटींचा विकास निधी आणला, व १६ कोटींच्या पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे, याचे श्रेय लाटण्यासाठी, निधीच्या अर्थकारणासाठी बंडखोरांनी व विरोधकांनी पक्षात फोडाफोडीचे राजकारण केले. (वार्ताहर)
जव्हारकरांनी राष्ट्रवादीला बहुमत दिले असतांना बंडखोरीचे असे कोणते कारण घडले, यावर उत्तर देतांना मनिषा वाणी यांनी येणाऱ्या सहा महिंन्यात नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याने विरोधी पक्षाने मोठ्याप्रमाणात बोली लावून फोडाफोडीचे राजकारण केल्याचे सांगितले. त्यामुळे या बंडखोर नगरसेवकांनी हिंमत असेल तर पुन्हा निवडून यावे असे आव्हान दिले.