नवी मुंबईत बहिणीच्या घरात घरफोडी करून लाखो रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी एका २९ वर्षीय महिलेला अटक करण्यात आली. विशेष म्हणजे, चोरी झाल्यानंतर अवघ्या आठ तासांत पोलिसांनी आरोपी महिलेला बेड्या ठोकल्या. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑगस्ट रोजी तक्रारदार महिला आपल्या आईला भेटण्यासाठी घराला कुलूप लावून बाहेर गेली होती. परतल्यानंतर घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याची सबंधित महिलेच्या लक्षात आले. या महिलेने ताबडतोब पोलीस ठाणे गाठून अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार नोंदवली. त्यानंतर घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी तपासणी केली असता चोर दरवाजाचे कुलूप तोडून घरात शिरल्याचे कोणतेही चिन्ह दिसून आले नाहीत. त्यामुळे हा गुन्हा महिलेच्या ओळखीतील व्यक्तीनेच केला असावा, असा पोलिसांना संशय आला.
यानंतर पोलिसांनी मोबाईल डेटा आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना तक्रारदार महिलेच्या बहिणीवर संशय आला. तिची चौकशी केली असता सुरुवातीला तिने उडवाउडीचे उत्तर दिले. परंतु, त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी महिलेला अटक करण्यात आली. विशेष म्हणजे, पोलिसांनी अवघ्या आठ तासांत याप्रकरणाचा छडा लावला. आरोपी महिलेने बहिणीच्या घरातून २४.२४ लाख रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरी केल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.