नवी मुंबई - शेजारच्या दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून ज्वेलर्सच्या दुकानात चोरी
By नामदेव मोरे | Updated: September 19, 2022 17:26 IST2022-09-19T17:25:37+5:302022-09-19T17:26:20+5:30
कामोठेमधील घटना - ८ किलो चांदीसह दागिने चोरीला

नवी मुंबई - शेजारच्या दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून ज्वेलर्सच्या दुकानात चोरी
नवी मुंबई : कामोठे सेक्टर ११ मधील लक्ष्मी ज्वेलर्स दुकानामध्ये रविवारी रात्री चोरीचा प्रयत्न झाला. चोरट्यांनी ज्वेलर्स शॉपच्या मागील दुकान भाड्याने घेऊन भिंतीला भगदाड पाडून दुकानामध्ये प्रवेश केला व ८ किलो चांदीचे दागिने घेऊन पलायन केले. तिजोरी उघडली नसल्यामुळे सोन्याचे दागिने चाेरी करता आले नाहीत.
वसंत बहार इमारतीमध्ये लक्ष्मी ज्वेलर्सचे दुकान आहे. या दुकानाच्या मागील बाजूचे दुकान चोरट्यांनी काही दिवसांपूर्वी भाडेतत्वावर घेतले. चायनीज खाद्यपदार्थांचा व्यवसाय करण्यासाठी दुकान घेतले होते. दुकान भाड्याने देणाऱ्या दुकान मालकाने भाडेकरूचा फोटो व इतर माहिती घेतली नाही व पोलिसांनाही दिली नव्हती. चोरट्यांनी भिंतीला भगदाड पाडून रात्री ज्वेलर्स शॉपमध्ये प्रवेश केला व आतमधील जवळपास ८ किलो वजनांचे चांदीचे दागिने चोरून नेले.
दुकानामधील तिजोरी उघडली नसल्यामुळे त्यांना दागिने चोरता आले नाहीत. या प्रकरणी पोलिसांनी कामोठे पोलीस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक पोलिसांबरोबर गुन्हे शाखेचे पथक या गुन्ह्याचा तपास करत आहेत.