Navi Mumbai: गुंगीचे चॉकलेट देऊन विद्यार्थ्याला लुटले, एपीएमसीमधील घटना
By सूर्यकांत वाघमारे | Updated: October 29, 2023 00:33 IST2023-10-29T00:32:21+5:302023-10-29T00:33:07+5:30
Navi Mumbai: वाहन चालक परवाना काढण्यासाठी आरटीओ चाचणी मैदानावर आलेल्या तरुणाला गुंगीचे चॉकलेट देऊन लुटल्याची घटना घडली आहे.

Navi Mumbai: गुंगीचे चॉकलेट देऊन विद्यार्थ्याला लुटले, एपीएमसीमधील घटना
नवी मुंबई - वाहन चालक परवाना काढण्यासाठी आरटीओ चाचणी मैदानावर आलेल्या तरुणाला गुंगीचे चॉकलेट देऊन लुटल्याची घटना घडली आहे. हा तरुण चालत बस थांब्याकडे जात असताना अनोळखी व्यक्तीने त्याच्यासोबत गप्पा मारत त्याला चॉकलेट दिले होते. यानंतर सुमारे १२ तास हा विद्यार्थी बस थांब्यावर बेशुद्ध अवस्थेत पडून होता.
घणसोली गाव येथे राहणाऱ्या यश सोनावणे (१९) याच्यासोबत हा प्रकार घडला आहे. शुक्रवारी तो एपीएमसी मधील आरटीओ चाचणी मैदानात शिकाऊ चालक परवान्याची चाचणी देण्यासाठी गेला होता. दुपारी साडेबारा च्या सुमारास तो घरी जाण्यासाठी तो कोपरी येथील बस थांब्यापर्यंत चालत आला होता. त्यावेळी सोबत चालणाऱ्या एका व्यक्तीने दोघेही बस थांब्यावर पोचले असता गप्पा मारत चॉकलेट खायला दिले. यानंतर ती व्यक्ती तिथून निघून गेली असता यशला गुंगी येऊन तो बेशुद्ध पडला. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तो शुद्धीत आला असता त्याच्या खिशातील मोबाईल व इतर कागदपत्रे असा ११ हजाराचा ऐवज चोरीला गेल्याचे उघड झाले. याप्रकरणी शनिवारी त्याने एपीएमसी पोलिसांकडे तक्रार केली असता अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.