Navi Mumbai: सहा महिन्यांत ईटीपी, एसटीपी सुरू करा, महापालिकेला प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दणका
By नारायण जाधव | Updated: October 12, 2022 17:50 IST2022-10-12T17:49:25+5:302022-10-12T17:50:26+5:30
Navi Mumbai: नवी मुंबई महापालिकेचे वाशी येथील ३०० खाटांचे हॉस्पिटल हे एसटीपी आणि ईटीपी प्लांटविना चालत असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निदर्शनास आले आहे.

Navi Mumbai: सहा महिन्यांत ईटीपी, एसटीपी सुरू करा, महापालिकेला प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दणका
- नारायण जाधव
नवी मुंबई - नवी मुंबई महापालिकेचे वाशी येथील ३०० खाटांचे हॉस्पिटल हे एसटीपी आणि ईटीपी प्लांटविना चालत असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निदर्शनास आले आहे. याची गंभीर दखल घेऊन मंडळाने येत्या सहा महिन्यांत याठिकाणी पूर्ण क्षमतेचा एसटीपी किंवा ईटीपी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय आरोग्य सेवा देण्यासाठी आवश्यक असलेल्या नियमानुसार बँक गॅरंटी भरण्यासही सांगितले आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मूल्यमापन समितीच्या २९ सप्टेंबर २०२२ रोजी झालेल्या आठव्या बैठकीत या झालेल्या चर्चेनुसार नवी मुंबई महापालिकेस हे आदेश देण्यात आले आहेत.
महापालिकेचे हे हॉस्पिटल वाशी सेक्टर १० येथील १,९१,१३४ इतक्या विस्तीर्ण क्षेत्रफळावर बांधले आहे. ते सुरू करण्याठी २००९ मध्ये परवानगी दिली होती. ती २०११ पर्यंत होती, तर महापालिकेला बॉम्बे नर्सिंग होम ॲक्टनुसार एसटीपी अर्थात सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट किंवा ईटीपी अर्थात इन्फ्ल्यूएंट ट्रीटमेंट सुरू करण्यास सांगितले होते. त्यासाठी ३१ मार्च २०२२ पर्यंतची मुदत होती; परंतु हॉस्पिटल सुरू झाल्यापासून आजपर्यंत महापालिकेने यापैकी काहीही केलेले नाही. आरोग्यविषयक नियमांच्या महापालिकेचे हे कृत्य पूर्णत: विरोधात असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्याची गंभीर दखल घेतली आहे.
पिवळ्या श्रेणीतील कचरा विल्हेवाट प्रमाणपत्र घ्या
हॉस्पिटल सुरू झाल्यापासून नवी मुंबई महापालिकेने रुग्णालयातून निर्माण होणाऱ्या जैववैद्यकीय कचरा विल्हेवाटीसाठी आवश्यक असलेले पिवळ्या श्रेणीतील कचरा विल्हेवाटीचे प्रमाणपत्र आजपर्यंत घेतलेले नसल्याची बाबही प्रदूषण मंडळाच्या निदर्शनास आली आहे. यामुळे असे प्रमाणपत्र सादर करण्यासही मंडळाने महापालिकेने सांगितले आहे.
१५० खाटा दिल्या खासगी हॉस्पिटलला
नवी मुंबई महापालिकेने या हॉस्पिटलमधील ३०० पैकी १५० खाटा या एका खासगी हॉस्पिटलला नियमबाह्यरीत्या दिल्या आहेत. त्याठिकाणी पंचतारांकित खासगी रुग्णालय सुरू आहे. यामुळे हे खासगी हॉस्पिटल आता एसटीपी किंवा ईटीपी सुरू करण्याबाबत काय भूमिका घेते अन् महापालिका त्यावर काय कार्यवाही करते याकडे वैद्यकीय तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे.