नवी मुंबईत शिवसेना दोन वर्षांपासून नेतृत्वाच्या शोधात
By Admin | Updated: March 22, 2017 01:40 IST2017-03-22T01:40:08+5:302017-03-22T01:40:08+5:30
शिवसेनेमधील गटबाजी थांबविण्यासाठी मातोश्रीवर पक्षप्रमुखांना बैठक आयोजित करावी लागली. बैठकीनंतर मतभेद संपल्याचे जाहीर केले असले

नवी मुंबईत शिवसेना दोन वर्षांपासून नेतृत्वाच्या शोधात
नवी मुंबई : शिवसेनेमधील गटबाजी थांबविण्यासाठी मातोश्रीवर पक्षप्रमुखांना बैठक आयोजित करावी लागली. बैठकीनंतर मतभेद संपल्याचे जाहीर केले असले, तरी दुभंगलेली मने व संघटनेतील ज्येष्ठत्वाची स्पर्धा, यामुळे सुरू झालेली भांडणे सहजासहजी संपणार नाहीत.
डिसेंबर २०१४ पासून जिल्हा प्रमुखपद नेमता आलेले नसून, सद्यस्थितीमध्ये स्वयंघोषित नेत्यांची संख्या वाढल्यामुळे निष्ठावंत शिवसैनिकांची नाराजी व्यक्त होण्यास सुरुवात झाली आहे. नवी मुंबई शिवसेनेतील वाद विकोपाला गेले आहेत. आता सर्वांसमोर आलेल्या गटबाजीला लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या राजन विचारे यांना ऐरोली मतदार संघातून ९३,६१० व त्यांचे प्रतिस्पर्धी संजीव नाईक यांना ७३,१७६ मते पडली. बेलापूर मतदार संघात विचारे यांना ९०,९८६ व नाईक यांना ६५,२०२ मते पडली. नाईकांच्या बालेकिल्ल्याला सेनेने खिंडार पाडले व शिवसैनिकांचा उत्साह प्रचंड वाढला. आता विधानसभा व महापालिकेत भगवा फडकणारच, अशा वल्गना सुरू झाल्या. विधानसभा निवडणुकीमध्ये दोन्ही मतदार संघात उमेदवारीवरून भांडणे झाली. अखेर या भांडणाची फलनिष्पत्ती पराभवामध्ये झाली. पराभवामुळे विजय नाहटा व विजय चौगुले यांच्यातील वाद विकोपाला गेले व वडार भवनमध्ये दोघांनी एकमेकांवर उघडपणे तोंडसुख घेतले. यानंतर डिसेंबर २०१४मध्ये चौगुले यांच्यावर बलात्काराचा आरोप झाला व पक्षाने त्यांना जिल्हाप्रमुख पदावरून दूर केले.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पाडून अनेकांच्या हातामध्ये भगवा देण्यात आला. यामुळे निवडणुकीमध्ये नगरसेवकांची संख्या वाढली; पण वाढलेल्या संख्येला नियंत्रणात ठेवण्यासाठी नेतृत्वच शिल्लक राहिले नाही.
तब्बल २ वर्षे ३ महिने नवी मुंबईमध्ये जिल्हा प्रमुखपदाची नियुक्ती केलेली नाही. पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार राजन विचारे यांची सर्व नगरसेवकांवर पकड नाही. विजय नाहटा हे पाहुणे कलाकार बनले आहेत. एम. के. मढवी, शिवराम पाटील, नामदेव भगत यांच्यासारखे दिग्गज नगरसेवक पक्षात असल्याने पूर्वीसारखे चौगुले यांचे एकहाती वर्चस्व राहिलेले नाही. पक्षाने नव्याने आलेल्यांचा विश्वास संपादन करण्यापेक्षा त्यांच्याशी वाद वाढविण्याकडेच जास्त वेळ चौगुले व त्यांच्या समर्थकांचा गेला. हे वाद वाढविण्याऐवजी त्यात भर टाकण्याचे काम इतरांनी केले आहे. शिवसेनेमध्ये सगळा सावळा गोंधळ निर्माण झाला असून फूट पडण्याच्या भीतीने कार्यकारिणीच जाहीर केली जात नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.