नवी मुंबई महापालिका पाच शहरांना देणार स्वच्छतेचे धडे; ‘स्वच्छ शहर जोडी’ उपक्रमांतर्गत करार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 12:05 IST2025-09-28T11:58:32+5:302025-09-28T12:05:01+5:30
स्वच्छता मोहिमेला अधिक गती देण्यासाठी केंद्र सरकारने गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या माध्यमातून ‘स्वच्छ शहर जोडी’ हा उपक्रम सुरू केला आहे.

नवी मुंबई महापालिका पाच शहरांना देणार स्वच्छतेचे धडे; ‘स्वच्छ शहर जोडी’ उपक्रमांतर्गत करार
नवी मुंबई : स्वच्छता मोहिमेला अधिक गती देण्यासाठी केंद्र सरकारने गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या माध्यमातून ‘स्वच्छ शहर जोडी’ हा उपक्रम सुरू केला आहे. त्यासाठी नवी मुंबई पालिकेची मार्गदर्शक शहर म्हणून निवड झाली असून, महापालिकेने लोणार, केज, मलकापूर, जिंतूर व कन्नड या पाच नगर परिषदांना स्वच्छताविषयक मार्गदर्शनासाठी सामंजस्य करार केला आहे.
दूरदृश्य प्रणालीद्वारे देशभरातील १९६ शहरांसोबत ७२ मार्गदर्शक शहरांचा सहभाग नोंदवण्यात आला. नवी मुंबई पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नगर परिषदांच्या मुख्याधिकाऱ्यांशी संवाद साधला. करारावर सही करताना अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, उपायुक्त डॉ. अजय गडदे उपस्थित होते.
दरवर्षी स्वच्छतेत उच्च स्थान पटकावणाऱ्या शहरांना ‘सुपर स्वच्छ लीग’ या विशेष श्रेणीत मानांकन मिळते. नवी मुंबईचा यात समावेश झाल्यानंतर आता ती इतर शहरांना मार्गदर्शन करणार आहे. नवी मुंबईकरांसाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.
- डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई महापालिका
स्वच्छता हीच सेवा
‘स्वच्छता हीच सेवा’ अभियान काळात राबविण्यात आलेल्या उपक्रमांतर्गत दृश्यमान स्वच्छता, कचरा वर्गीकरण, घनकचरा प्रक्रिया, सांडपाणी व्यवस्थापन, सेवांचे यांत्रिकीकरण, स्वच्छताकर्मी कल्याण, नागरिकांचा सहभाग आणि तक्रार निवारण या आठ क्षेत्रांवर विशेष भर दिला जाणार आहे. नवी मुंबई महापालिका या शहरांना अनुभवाधारित मार्गदर्शन करणार असून, त्यांच्या स्वच्छ सर्वेक्षणातील क्रमवारीत सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न
होणार आहे.