लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या नोकरीभरतीसाठी राज्यातील २८ केंद्रांवर दुसऱ्या दिवशी १८ हजार ४४२ उमेदवारांनी परीक्षा दिली. यात कोल्हापूरमधील केंद्रावर पर्यवेक्षक उमेदवारास उत्तरे सांगत असल्याचे चित्रीकरणात लक्षात आल्याने त्याला तत्काळ हटवून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले आहे.
कर्मचारी भरतीची प्रक्रिया पारदर्शीपणे पार पाडण्यावर प्रशासनाच्या माध्यमातून लक्ष देण्यात येत आहे. गुरुवारी दुपारच्या सत्रामध्ये कोल्हापूरमधील एका केंद्रावर पर्यवेक्षकाच्या माध्यमातून उमेदवारांना उत्तरे सांगण्यात आल्याची तक्रार प्राप्त झाली होती. याविषयी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असता उमेदवारास दोन ते तीन प्रश्नांची उत्तरे सांगितली जात असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी पर्यवेक्षकास तत्काळ हटविले आहे. महापालिकेच्या समन्वय अधिकाऱ्याने परीक्षा घेणाऱ्या टीसीएस संस्थेलाही संबंधितावर कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. यानुसार संबंधितावर गुन्हा दाखल केला जात आहे.
पहिल्या दिवशी २१ हजार ११५ जणांनी, तर दुसऱ्या दिवशी १८ हजार ४४२ जणांनी परीक्षा दिली आहे. १२ जिल्ह्यांमध्ये २८ केंद्रांवर परीक्षा सुरू आहे. दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रामध्ये ६२२३, दुपारच्या सत्रात ६२३४ व सायंकाळच्या सत्रामध्ये ५९८५ जणांनी परीक्षा दिली आहे.