Navi Mumbai: घरात घुसून केले अल्पवयीन मुलीचे अपहरण, नातेवाईकावर गुन्हा दाखल
By सूर्यकांत वाघमारे | Updated: October 27, 2023 23:28 IST2023-10-27T23:27:49+5:302023-10-27T23:28:09+5:30
Navi Mumbai News: मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरुवारी रात्री नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Navi Mumbai: घरात घुसून केले अल्पवयीन मुलीचे अपहरण, नातेवाईकावर गुन्हा दाखल
नवी मुंबई : मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरुवारी रात्री नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहरणात मुलीच्या एका नातेवाईकाचा हात असल्याचा आरोप मुलीच्या आईने केला आहे. मुलीचे आयुष्य बनवतो असे सांगून त्याने जबरदस्ती घरात घुसून तिला उचलून नेल्याचा आरोप केला आहे.
नेरुळ परिसरात राहणाऱ्या कुटुंबासोबत शनिवारी मध्यरात्री हि घटना घडली आहे. परिसरात राहणारी महिला तिच्या दोन मुलींसह घरात झोपली होती. तर तिचे पती कामानिमित्त गावी गेले होते. यावेळी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास त्यांचा दरवाजा बाहेरून वाजला. यामुळे महिलेने दरवाजा उघडला असता तोंडावर रुमाल बांधलेले दोघेजण घरात शिरले. त्यांच्यासोबत झटापट करताना एकाचा रुमाल निघाला असता तो महिलेचा नातेवाईकच होता.
यावेळी महिलेने त्याला घरात घुसण्यामागचे कारण विचारले असता, दोघांनी महिलेच्या १६ वर्षीय सावत्र मुलीला उचलून घेऊन जाऊ लागले. परंतु महिलेने त्यांना विरोध केला असता मुलीचे आयुष्य बनवतो असे तो म्हणत होता. यानंतर त्याने महिलेला धक्काबुकी करून घराला बाहेरून कडी लावून पळ काढला. गुरुवारी महिलेचे पती गावरून घरी आल्यानंतर तिने घडलेला प्रकार पतीला सांगितलं. त्यानुसार नेरुळ पोलिस ठाण्यात गमीर शेख व इतर एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने अल्पवयीन मुलीला अपहरण करून कुठे नेले व त्यामागचा उद्देश काय याचा अधिक तपास नेरुळ पोलिस करत आहेत.