Navi Mumbai: टीशर्टवर नाव छापण्यावरून दोन गटात हाणामारी, कोपर खैरणेतली घटना
By सूर्यकांत वाघमारे | Updated: March 14, 2023 17:17 IST2023-03-14T17:16:48+5:302023-03-14T17:17:33+5:30
Navi Mumbai: पाच हजार रुपये घेऊनही टीशर्टवर नाव न छापल्याच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना सोमवारी रात्री कोपर खैरणेत घडली. यामध्ये दोघांवर कोयत्याने वार झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Navi Mumbai: टीशर्टवर नाव छापण्यावरून दोन गटात हाणामारी, कोपर खैरणेतली घटना
नवी मुंबई - पाच हजार रुपये घेऊनही टीशर्टवर नाव न छापल्याच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना सोमवारी रात्री कोपर खैरणेत घडली. यामध्ये दोघांवर कोयत्याने वार झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोन्ही गटातील बहुतांश मुले अल्पवयीन असून त्यांच्यावर कोपर खैरणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात ठिकठिकाणी मंडळांच्या नावाखाली टोळ्या तयार होत असून त्यामधून गुन्हेगारी कृत्ये घडत आहेत. त्यात अल्पवयीन मुले देखील गुन्हेगारी मार्गाला जात असल्याचे चित्र सातत्याने समोर येत आहे. असाच प्रकार सोमवारी रात्री कोपर खैरणे सेक्टर १६ येथे घडला आहे. त्याठिकाणी राहणाऱ्या साहिल खरुशे व त्याच्या मित्र सहकाऱ्यांनी भाजप युवा मोर्चा उपशहर अध्यक्ष सुनील किंद्रे याच्याकडून टिशर्ट छापण्यासाठी ५ हजार रुपयांची वर्गणी घेतली होती. मात्र पैसे घेऊन देखील टिशर्टवर त्याचे नाव छापण्यात आले नव्हते. यामुळे सुनीलचा भाऊ लखन किंद्रे याने साहिल व त्याच्या सहकाऱ्यांकडे याबाबत चौकशी केली होती. त्यावरून त्यांच्यात वाद झाला असता सोमवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास दोन्ही गट समोरासमोर आले. त्यामध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीत घटनास्थळी पडलेला कोयता उचलून लखन याने साहिल व त्याचा मित्र अविष्कार पार्टे यांच्यावर वार केले. या हाणामारीत दोन्ही गटातली मुले जखमी झाली असून त्यात बहुतांश मुले १५ ते १७ वयोगटातली आहेत.
याप्रकरणी सुनील किंद्रे याच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गुन्ह्यात वापरला गेलेला कोयता हा साहिल व त्याचे साथीदार घेऊन आले होते असेही पोलिसांकडून समजते. दोन्ही गटात झटपट झाली असता साहिलच्या साथीदाराच्या हातून कोयता खाली पडला असता लखन याने तोच कोयता उचलून साहिल व अविष्कार यांच्यावर वार केल्याचेही पोलिसांकडून समजते. त्यानुसार याप्रकरणी साहिल व त्याच्या साथीदारांवर देखील गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली पोलिसांकडून सुरु आहेत. दरम्यान याप्रकरणी मंगळवारी दुपारी पोलिसांनी काहींना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे कोपर खैरणे सेक्टर १६ परिसरात काही वेळासाठी तणाव निर्माण झाला होता. तर सतत गुन्हेगारी कृत्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा दिसून येणारा सहभाग वाढत्या बालगुन्हेगारीचे दर्शन घडवत आहे. त्यामुळे मंडळांच्या आडून वाढती बालगुन्हेगारी रोखण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.