Navi Mumbai: आणखी एका श्री सदस्याचा मृत्यू, मृतांचा आकडा १४, ७ जणांवर उपचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 13:36 IST2023-04-19T13:35:59+5:302023-04-19T13:36:09+5:30
Navi Mumbai: खारघरमधील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान उष्माघाताने मृत्युमुखी पावलेल्या रुग्णांचा आकडा १४ वर पोहोचला आहे.

Navi Mumbai: आणखी एका श्री सदस्याचा मृत्यू, मृतांचा आकडा १४, ७ जणांवर उपचार
पनवेल : खारघरमधील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान उष्माघाताने मृत्युमुखी पावलेल्या रुग्णांचा आकडा १४ वर पोहोचला आहे. वाशी एमजीएम रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ३४ वर्षीय स्वाती राहुल वैद्य (रा. विरार) यांची प्राणज्योत दि. १८ रोजी मालवली. अद्यापही सात जणांवर तीन रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये एमजीएम वाशी रुग्णालयात २ रुग्ण, खारघर मेडिकव्हरमध्ये एक आणि कामोठे एमजीएम रुग्णालयात चार रुग्ण उपचार घेत आहेत. सर्वांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त विठ्ठल डाके यांनी दिली. पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात मृताचे शवविच्छेदन पार पडल्यानंतर हा मृतदेह विरार येथे पाठविण्यात आला. दरम्यान, उर्वरित रुग्णांनादेखील पुढील काही दिवसांत डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याला या घटनेमुळे गालबोट लागले. या घटनेनंतर आरोग्य विभागाने तत्काळ आपली भूमिका बजावली आहे. पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. आनंद गोसावी, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शेटे, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त कैलास गावडे, सहायक आयुक्त डॉ. वैभव विधाते यांच्यासह चारही प्रभागांचे प्रभाग अधिकारी मागील दहा दिवसांपासून कार्यक्रमस्थळी त्यानंतर उद्भवलेल्या अत्यावश्यक परिस्थितीला सामोरे जात होते.