‘व्हीआयपी’पणाची सुखद अनुभूती अन्... तंत्रज्ञान, खाद्यसंस्कृती आणि जागतिक सुविधांचा संगम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 09:28 IST2025-10-08T09:27:51+5:302025-10-08T09:28:10+5:30
एकदम ‘स्मार्ट’ आणि आल्हाददायक पंचतारांकित अनुभव...

‘व्हीआयपी’पणाची सुखद अनुभूती अन्... तंत्रज्ञान, खाद्यसंस्कृती आणि जागतिक सुविधांचा संगम
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : बुधवारी देशाला लोकार्पण होणारे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे केवळ प्रवासाचे केंद्र ठरणार नाही, तर तंत्रज्ञान, खाद्यसंस्कृती आणि जागतिक सुविधांचा संगम ठरणार आहे. मुंबईच्या वाढत्या हवाई वाहतुकीला दिलासा देण्याबरोबरच देश-विदेशातील प्रवाशांना ‘स्मार्ट’ आणि आल्हाददायक तसेच एकंदर पंचतारांकित अनुभव मिळणार आहे.
फाइव्ह-जी कनेक्टिव्हिटी, डिजियात्रामार्फत संपर्कमुक्त प्रवास, मानवरहित ओळख तपासणी, आंतरराष्ट्रीय मानकांनुसार सामानाचे थेट ट्रॅकिंग या सोयी विमानतळाच्या प्रवेशद्वारापासूनच प्रवाशांना जाणवतील. आयओटी आणि स्मार्ट व्यवस्थापनामुळे टर्नअराउंड वेळेत बचत होईल, तर भक्कम सायबर सुरक्षेमुळे विमानतळ खऱ्या अर्थाने अत्याधुनिक ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
फक्त तंत्रज्ञानच नव्हे, तर चविष्ट खाद्यपदार्थ आणि खरेदीसाठीही भरगच्च पर्याय प्रवाशांसाठी उपलब्ध असतील. आर्टिसनल टी, लोकप्रिय मुंबई ब्रँड्स, आंतरराष्ट्रीय दर्जाचा फूड हॉल, शेफ-क्युरेटेड डायनिंग आणि ब्रुअरी-बार्स प्रवाशांचा प्रवासच नव्हे, तर ‘खाद्यप्रवास’ही संस्मरणीय करतील. त्याशिवाय सांस्कृतिक वारशाला मान देणारा डिजिटल आर्ट प्रोग्रॅम, किड्स झोन, ५०० प्रवाशांसाठी आलिशान लाउंजेस, ट्रांझिट होस्टेल्स, स्वागताची ‘प्रणाम सेवा’ आणि घरपोच सामान सेवा आदींमुळे या विमानतळाला वेगळाच दर्जा लाभणार आहे.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे हाेणार दर्शन
प्रवाशांचे स्वागत करणारे डिजिटल आर्ट इन्स्टॉलेशन्स हे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. सात गोलाकार एलईडी स्क्रीन्स, दोन इंटरॲक्टिव्ह डिस्प्ले व सिक्युरिटी चेकनंतर उभारण्यात येणारे जगातील सर्वांत मोठ्या इन्स्टॉलेशन्सपैकी एक असे प्रदर्शन थक्क करणार आहे. त्याशिवाय महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविणाऱ्या फायब्रिक फोरेस्ट आणि सिक्युरिटी चेकनंतर तणाव कमी करण्यासाठी खास तयार केलेले इमर्शिव्ह डिजिटल एक्सप्रियन्स या कलाकृती वेगळेपण सिद्ध करतात.
पहिल्या टर्मिनलची रचना करताना चार मोठी प्रवेशद्वारे देण्यात येणार आहेत, तर प्रवाशांच्या व्यवस्थापनासाठी अल्फा, ब्रावो आणि चार्ली अशी तीन प्रमुख केंद्र उभारली जाणार आहेत.