डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 07:28 IST2025-12-22T07:28:10+5:302025-12-22T07:28:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दि. २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांसाठी खुले होत आहे. ...

डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दि. २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांसाठी खुले होत आहे. सध्या हे विमानतळ केवळ भव्य टर्मिनल, धावपट्ट्या आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळेच नव्हे, तर जागतिक स्तरावर मान्य असलेल्या ऑपरेशनल रेडिनेस अँड एअरपोर्ट ट्रान्सफर (ORAT) या व्यापक तयारी प्रक्रियेमुळे चर्चेत आहे.
विमानतळ प्रत्यक्ष वापरात येण्यापूर्वी त्याच्या प्रत्येक यंत्रणा, प्रक्रिया आणि मनुष्यबळाची प्रत्यक्ष परिस्थितीत चाचणी घेण्याची शिस्तबद्ध
प्रक्रिया म्हणजेच ओआरएटी होय. विमानतळ सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी कोणताही गोंधळ होऊ नये, यासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
प्रत्येक स्तरावर प्रशिक्षण
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संचालन प्रक्रियेत यासंबंधीच्या घटकांचा समन्वय साधण्यात आला आहे. विमान कंपन्या, सीआयएसएफ, हवाई वाहतूक नियंत्रण (एटीसी), ग्राउंड हँडलिंग एजन्सी, आपत्कालीन सेवा, व्यापारी आस्थापना आणि विमानतळ कर्मचारी आदी घटकांची यात भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. नवीन टर्मिनल लेआउट, प्रवासी प्रवाह, स्वयंचलित प्रणाली आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्स यांचे प्रशिक्षण प्रत्येक स्तरावर देण्यात आले आहे.
लाइव्ह ऑपरेशनल ट्रायल्स
ओआरएटीचा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे ‘लाइव्ह ऑपरेशनल ट्रायल्स’. या टप्प्यात स्वयंसेवक प्रवाशांच्या भूमिकेतून चेक-इन, सुरक्षा तपासणी, बोर्डिंग, बॅगेज हँडलिंग आणि आपत्कालीन परिस्थितींची प्रत्यक्ष चाचणी घेण्यात आली.
हरवलेली कागदपत्रे, जादा सामान, सहकार्याची गरज असलेले प्रवासी, सुरक्षा तपासणीदरम्यान गर्दीचे व्यवस्थापन अशा रोजच्या आव्हानांची जाणीवपूर्वक निर्मिती करून यंत्रणा तपासण्यात आली.
तंत्रज्ञानाच्या पातळीवरही काटेकोर चाचण्या घेण्यात आल्या. डिजिटल चेक-इन, रिअल-टाइम मॉनिटरिंग, एकात्मिक सुरक्षा प्रणाली आणि बॅगेज सिस्टीम यांचा ताणतणावात कार्यक्षमतेने प्रतिसाद तपासण्यात आला. या सर्व प्रक्रियेचा थेट लाभ प्रवाशांना मिळणार आहे.