नवी मुंबई विमानतळ महामुंबईचे 'ग्रोथ इंजिन'; विमानतळावरच ८० खोल्यांचे ट्रान्झिट होस्टेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 09:24 IST2025-12-20T09:23:40+5:302025-12-20T09:24:57+5:30
या विमानतळावरून आंतरराष्ट्रीय वाहतूक फेब्रुवारीपासून सुरू होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

नवी मुंबई विमानतळ महामुंबईचे 'ग्रोथ इंजिन'; विमानतळावरच ८० खोल्यांचे ट्रान्झिट होस्टेल
नवी मुंबई : नवी मुंबई विमातळ विस्तारासह राज्य सरकार, सिडको व एमएमआरडीएचे प्रकल्प पाहता है विमानतळ महामुंबईच्या विकासाचे ग्रोथ इंजिन बनेल, असा विश्वास अदानी एअरपोर्ट कंपनीचे संचालक जीत अदानी यांनी व्यक्त केला. नाताळपासून उड्डाणे सुरू होणार असल्याने येथील कामांचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते. येथे प्राचीन संस्कृती व लोकसंस्कृतीचे दर्शन घडेल, असे ते म्हणाले.
या विमानतळावरून आंतरराष्ट्रीय वाहतूक फेब्रुवारीपासून सुरू होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
पहिल्या दिवशी प्रवाशांचे होणार अनोखे स्वागत
पहिल्या दिवशी ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे स्वागत वेगळ्या रितीने आणि पारंपरिक पद्धतीने केले जाणार आहे. त्यामुळे हा प्रवास ते कधीही विसरू शकणार नाहीत. प्रत्येक महिन्यासाठी वेगळी थीम डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारचे प्रवाशांचे स्वागत केले जाईल, असे जीत अदानी यांनी म्हणाले.
८० खोल्यांचे ट्रान्झिट होस्टेल
लांबच्या विमानप्रवासाला जाणाऱ्या प्रवाशांसाठी विमानतळ परिसरातच ८० खोल्यांच्या ट्रान्झिट होस्टेलची सोय केलेली आहे. त्यामुळे विमानतळावर थांबणाऱ्या प्रवाशांना आरामदायक निवास सुविधा मिळेल.
विमानतळावर याचे घडेल दर्शन
अंतर्गत सजावटीत मुंबईचे ससून डॉक, दादरच्या फूल बाजारासह वारली पेंटिंगचे दर्शन घडेल. शिवाय खाद्य पदार्थांच्या लाऊंजमध्येही स्थानिक आणि भारतीय अन्नपदार्थांचा आस्वाद घेता येईल, भारतीय हस्तकलेच्या वस्तूंचेही स्टॉल असतील. मुंबईसह महाराष्ट्रासह भारताच्या कथा सांगणाऱ्या स्क्रीन, शिल्पांद्वारे विविध कलांचे दर्शनही घडेल.
इंधनासाठी २० दशलक्ष लीटरच्या टाक्या
सध्या विमानांना लागणाऱ्या जेट इंधनासाठीच्या जेएनपीए आणि आयपीसील तुर्भेपासून विमानतळापर्यंतच्या पाइपलाइनचे काम अपूर्ण आहे.
हे काम पूर्ण होईपर्यंत नवी मुंबई विमानतळावर ये-जा करणाऱ्या विमानांना जेट इंधनासाठी विमानतळ परिसरातच सात दिवस पुरेल, अशा २० दशलक्ष लिटर क्षमतेच्या टाक्यांद्वारे इंधनपुरवठा केला जाणार असल्याचे जीत अदानी यांनी सांगितले.