Navi Mumbai: त्या महिलेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल, घर सोडण्यास पाडले भाग
By सूर्यकांत वाघमारे | Updated: July 16, 2024 18:44 IST2024-07-16T18:44:05+5:302024-07-16T18:44:21+5:30
Navi Mumbai: समूहिक अत्याचार करून हत्या झालेल्या महिलेचा छळ केल्याप्रकरणी अखेर सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासरच्यांनी त्यांचा हुंड्यासह किरकोळ कारणांनी त्यांचा छळ करून घर सोडण्यास भाग पाडल्याचा माहेरच्यांचा आरोप आहे.

Navi Mumbai: त्या महिलेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल, घर सोडण्यास पाडले भाग
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई समूहिक अत्याचार करून हत्या झालेल्या त्या दुर्दैवी महिलेचा छळ केल्याप्रकरणी अखेर सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासरच्यांनी त्यांचा हुंड्यासह किरकोळ कारणांनी त्यांचा छळ करून घर सोडण्यास भाग पाडल्याचा माहेरच्यांचा आरोप आहे. त्यातूनच ती घळ गणपती मंदिरात गेली असता त्याठिकाणी तिघांची अत्याचार करून त्यांची हत्या केली. या परिस्थितीला कारणीभूत ठरल्याप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेलापूर येथील या महिलेच्या हत्येच्या एक आठवड्यानंतर अखेर सासरच्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती कुणाल म्हात्रे, सासू मंदा म्हात्रे व नणंद दीपमाला कडू यांच्यावर एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. लग्नापासून तिचा सासरी छळ सुरु होता. त्यातून अनेकदा त्या माहेरी देखील निघून येत होत्या. परंतु दोन्ही कुटुंबात सामंजस्यानंतर पुन्हा त्यांना सासरी पाठवलं जात होतं. तर यापूर्वी तिच्या सासरच्यांना कर्ज काढून १० लाख रुपये दिले असल्याचेही वडिलांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हंटल आहे. त्यानंतरही तिचा छळ सुरूच असताना शुक्रवारी तिला घर सोडण्यास भाग पाडले गेले. यावेळी सासरच्या त्रासाला कंटाळून मनःशांतीसाठी त्या शिळफाटा मार्गावरील घळ गणपती मंदिरात गेल्या असता त्याच ठिकाणी त्यांच्यावर अत्याचार करून तिघांनी त्यांची हत्या केली. तिच्यावर उद्भवलेला हा प्रसंग सासरच्या त्रासामुळे निर्माण झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्याबाबत त्यांनी एनआरआय पोलिसांकडे तक्रार केली असता तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांचा तपासात हलगर्जीपणा ?
हाी महिला शनिवारी सकाळी घर सोडून गेल्या असता माहेरच्या व सासरच्या व्यक्तींनी पोलिसांकडे धाव घेतली होती. परंतु तिचे मोबाईलद्वारे ठिकाण शोधण्याची कार्यतत्परता दाखवण्याऐवजी पोलिसांनी माहेरच्या व्यक्तींनाच संशयाच्या घेऱ्यात घेतले. जर पोलिसांनी वेळीच त्यांचे मोबाईल लोकेशन शोधले असते तर त्या मंदिरात आश्रयाला असल्याची माहिती मिळाली असती. यामध्ये त्यांच्यावरील वाईट प्रसंग टळून प्राण देखील वाचले असते अशी भावना त्यांच्या कुटुंबियांकडून व्यक्त होत आहे.