नेरूळमध्ये घरफोडीत ३० लाखाचा ऐवज लंपास, सीसीटीव्हीमुळे पटली गुन्हेगारांची ओळख
By सूर्यकांत वाघमारे | Updated: May 17, 2024 19:26 IST2024-05-17T19:24:58+5:302024-05-17T19:26:09+5:30
Navi Mumbai: नेरुळ येथे राहणाऱ्या प्राध्यापकाच्या घरी भरफोडीची घटना घडली आहे. यामध्ये घरातील सोन्याचे २० लाखाचे सिक्के व १० लाखाचे दागिने असा एकूण ३० लाखाचा ऐवज चोरीला गेला आहे. याप्रकरणी नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्हीद्वारे गुन्हेगारांची ओळख पटली आहे.

नेरूळमध्ये घरफोडीत ३० लाखाचा ऐवज लंपास, सीसीटीव्हीमुळे पटली गुन्हेगारांची ओळख
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई - नेरुळ येथे राहणाऱ्या प्राध्यापकाच्या घरी भरफोडीची घटना घडली आहे. यामध्ये घरातील सोन्याचे २० लाखाचे सिक्के व १० लाखाचे दागिने असा एकूण ३० लाखाचा ऐवज चोरीला गेला आहे. याप्रकरणी नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्हीद्वारे गुन्हेगारांची ओळख पटली आहे.
नेरुळ सेक्टर १० येथे हा प्रकार घडला आहे. त्याठिकाणी राहणारे नागेंद्रप्रसाद सिंग हे प्राध्यापक असून गुजरातमध्ये नोकरीवर आहेत. तर नेरूळमध्ये त्यांची पत्नी व मुलगा राहतात. मागील काही दिवसांपूर्वी त्यांची पत्नी गावी गेली असता मुलगा देखील कामानिमित्त घराबाहेर गेला होता. यामुळे त्यांचे घर बंद असताना अज्ञात गुन्हेगारांनी रात्री ९ च्या सुमारास घरफोडी केली होती. रिक्षातून आलेल्या चौघांपैकी दोघांनी बेधडक सोसायटीत प्रवेश करून त्यांच्या घराचे कुलूप तोडले होते. काही तासांनी शेजाऱ्यांना हा प्रकार निदर्शनात आल्यानंतर त्यांनी सिंग यांना कळवले होते. त्यानुसार सिंग दांपत्य घरी आल्यानंतर त्यांनी घरातील ऐवज तपासला. त्यामध्ये २० लाख रुपये किमतीचे सोन्याचे सिक्के व १० लाख ७८ हजाराचे दागिने असा एकूण ३० लाख ७८ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेल्याचे उघड झाले. याप्रकरणी गुरुवारी त्यांनी नेरुळ पोलिसांकडे तक्रार केली असता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीदरम्यान सोसायटीच्या सीसीटीव्हीत ९ मे रोजी रात्री ९ च्या सुमारास चोरटयांनी सोसायटीत प्रवेश केल्याचे दिसून आले आहे. यामुळे त्यांची ओळख पटली असून सर्वजण सराईत गुन्हेगार आहेत. त्यापैकी एकजण बोईसर पोलिसांच्या अटकेत असून त्याचा ताबा मागितला असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत यांनी सांगितले.