ज्येष्ठांच्या हक्कासाठी देशव्यापी चळवळ

By Admin | Updated: October 1, 2015 02:04 IST2015-10-01T02:04:48+5:302015-10-01T02:04:48+5:30

देशातील ११ कोटी ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कासाठी अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघाने लढा सुरू केला आहे. १४ वर्षांमध्ये २० लाख नागरिक या चळवळीमध्ये सहभागी झाले आहेत

The nationwide movement for the rights of the senior citizens | ज्येष्ठांच्या हक्कासाठी देशव्यापी चळवळ

ज्येष्ठांच्या हक्कासाठी देशव्यापी चळवळ

नामदेव मोरे, नवी मुंबई
देशातील ११ कोटी ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कासाठी अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघाने लढा सुरू केला आहे. १४ वर्षांमध्ये २० लाख नागरिक या चळवळीमध्ये सहभागी झाले आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींना पेन्शन, आरोग्य व विरंगुळा केंद्र या प्रमुख मागण्यांसह इतर प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.
भारत हा तरुणांचा देश असल्याचे प्रत्येक व्यक्ती सांगते. परंतु या देशामध्ये ११ कोटी ज्येष्ठ नागरिक राहात आहेत. यामधील अनेकांना वृद्धापकाळी सांभाळ करणारेही कोणीच नाहीत. औषधासाठी पैसे नाहीत. करमणुकीचे साधन नसल्यामुळे एकाकीपणाने ग्रासले असून अशा ज्येष्ठांच्या समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. केंद्र शासनाने १९९९ मध्ये ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर केले आहे. परंतु त्याची तंतोतंत अंमलबजावणी होत नाही. प्रत्येक राज्याला ज्येष्ठ नागरिक धोरण तयार करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु गोवा वगळता इतर राज्यात त्याची प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही. यामुळे देशातील ज्येष्ठ नागरिकांनी अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या माध्यमातून हे प्रश्न सोडविण्यासाठी चळवळ सुरू केली आहे. नवी मुंबई या चळवळीचे केंद्र झाले आहे. चळवळीची मुहूर्तमेढ रोवणारे डॉ. एस. पी. किंजवडेकर वयाच्या ८३ व्या वर्षी व डी. एन. चापके वयाच्या ७४ व्या वर्षीही देशभर फिरून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. किंजवडेकर यांनी सन २००० मध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यानंतर महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ व अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघ या दोन संघटना उभारून राज्यातील इतर संघटनांना या छत्राखाली आणण्यास सुरवात केली. देशातील १६ राज्यांचा दौरा करून विभागनिहाय ज्येष्ठ नागरिकांच्या संघटना बांधण्यास सुरवात केली. शासनाकडे पत्रव्यवहार करून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.
ज्येष्ठ नागरिक महासंघाने १४ वर्षांच्या वाटचालीमध्ये सनदशील मार्गाने हक्कासाठीची चळवळ उभी केली आहे. देशभरातून पंतप्रधान, मुख्यमंत्री यांना पोस्टकार्ड पाठवून समस्यांकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले. प्रत्येक वर्षी ज्येष्ठ नागरिकांची वार्षिक परिषद आयोजित केली जाते.आतापर्यंत उदयपूर, लखनौ, विशाखापट्टनम, भोपाळ व इतर ठिकाणी या परिषदा झाल्या आहेत. यासाठी देशातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून समस्यांवर चर्चा केली जाते. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री, मंत्री व इतर लोकप्रतिनिधींना भेटून त्यांच्याकडे ज्येष्ठांचे प्रश्न सोडविण्याची मागणी केली जात आहे. ७० ते ८५ वर्षांचे ज्येष्ठ नागरिकही या चळवळीत काम करत आहेत. तळमळीने ज्येष्ठ ांचे प्रश्न मांडत असताना शासन मात्र अद्याप या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे.
--------------
देशभर ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणारी महापालिका म्हणून नवी मुंबईची ओळख निर्माण झाली आहे. २००८ पासून ज्येष्ठांसाठी स्वतंत्र कक्ष तयार केला आहे. एनएमएमटीमध्ये प्रवासी भाड्यात ७५ टक्के सवलत सुरू केली आहे. मनपा रुग्णालयात मोफत उपचार सुरू केले आहेत. शहरात १५ विरंगुळा केंद्रे सुरू केली आहेत. या केंद्रांमध्ये कॅरम, बुद्धिबळ, वृत्तपत्रे, दूरदर्शन संच उपलब्ध करून दिला आहे. या धर्तीवर इतरत्र सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी ज्येष्ठ नागरिक करू लागले आहेत.

Web Title: The nationwide movement for the rights of the senior citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.