अंधश्रद्धेवर मात करून नागपंचमी साजरी
By Admin | Updated: August 19, 2015 23:43 IST2015-08-19T23:43:38+5:302015-08-19T23:43:38+5:30
शेतकऱ्यांचा मित्र अशी ओळख असणाऱ्या नागाच्या मूर्तीची विधीवत पूजा बुधवार नागपंचतीच्या निमित्ताने बोर्डी परिसरात पार पडली. दरम्यान,

अंधश्रद्धेवर मात करून नागपंचमी साजरी
बोडी : शेतकऱ्यांचा मित्र अशी ओळख असणाऱ्या नागाच्या मूर्तीची विधीवत पूजा बुधवार नागपंचतीच्या निमित्ताने बोर्डी परिसरात पार पडली. दरम्यान, शासनाचे कायदे आणि सर्पमित्रांच्या जनजागृती मोहिमेमुळे सर्पाविषयी समाजात पसरलेल्या अंधश्रद्धेवर मात देऊन हा सण साजरा झाला.
बोर्डी परिसर पश्चिम घाटाच्या कुशीत असल्याने येथे वेगवेगळे आकार, लांबी, जाडी व वैशिष्ट्य असलेल्या सर्पांच्या जाती आढळतात. नागपंचमीनिमित्त येथील खेडोपाड्यात सात प्रकारची द्विदलधान्ये, दूध, अंडी आदी नागराजाला अर्पण करण्याची प्रथा आहे. गारूडी पूर्वी परगावातून येथे येऊन दूध, अंडी गोळा करीत. मात्र कायदेशीर बंदी घातल्यानंतर यंदा असे प्रकारे दिसून आले नाहीत.
वाईल्डलाईफ, कन्झर्व्हेशन अँड अॅनिमल वेल्फेअर असोसिएशन या नोंदणीकृत संस्थेने जनजागृती मोहिम हाती घेऊन दूध हे नागांना विषासमान असल्याचे गावकऱ्यांना पटवून दिले. विषारी, बिनविषारी सापाची माहिती देण्यासाठी सर्पमार्गदर्शन विषयक कार्यशाळा घेतल्या. या सगळ्याचा परिणाम बुधवारी साजऱ्या झालेल्या नागपंचमतीत दिसून आला आहे. महिलावर्गाने नागांचे चित्र, रांगोळी रेखाटले व त्यांची पूजा केली. कायद्याला जनजागृतीची जोड दिल्यास समाजातील अनिष्ट प्रथांना आळा बसून पर्यावरण संवर्धन होईल असे मत या संस्थेचे संस्थापक धवल कसारा यांनी लोकमतकडे व्यक्त केले. (वार्ताहर)